Pune News, 12 June : लोकसभा निवडणुकीनंतर 'आरएसएस'शी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर साप्ताहिकात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखामध्ये भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केल्याचं लिहिलं आहे.
यावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे. महाराष्ट्रात आघाडीला तब्बल 31 जागा मिळाल्या तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीतील पराभवाचं विविध पक्ष तसेच तज्ञ वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण करत आहेत. असाच एक विश्लेषण करणारा लेख 'आरएसएस'शी (RSS) संबंधित असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाने प्रकाशित केला आहे.
या लेखांमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपने सोबत घेतलं या त्यांच्या रणनीतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचं अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचा लेख वाचून नंतर प्रतिक्रिया देणार असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान रोहित पवारांनी याबाबत एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, "अजितदादांसोबत जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावल्याची टीका ऑर्गनायझरमधून केल्याचं वाचनात आलं. केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती पण भाजपची ब्रँड व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली आहे.
भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव आहे आणि ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासून आम्ही हेच सांगत होतो हे आज खरं होताना दिसत आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलं असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.