

⁶Pune News : महापालिकेतर्फे ९० कोटी रुपयांचा नवीन रस्ता केला जात असताना शहरातील एका आमदारांचा लाडका ठेकेदार पात्र होत नसल्याने त्यावरून अनेक महिने निर्णय प्रलंबित होता. यावर आयुक्तांनी अखेर निर्णय घेतल्यानंतर या आमदारांनी आयुक्तांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. तर पथ विभागातील अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग आणल्यावर तुम्हाला कळेल अशी धमकी दिल्याने प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, या धमकीबाबत विचारले असता आयुक्त नवल किशोर राम यांनी यास दुजोरा दिला, पण नाव उघड केले नाही.
आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि दोन किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या ९० कोटींच्या कामासाठी डिसेंबर २०२५ मध्ये निविदा काढण्यात आली होती. यात आठ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी संबंधित आमदाराने प्रशासनावर दबाव आणला होता. या राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सहा ते सात महिने रखडली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने १७ जुलैरोजी वृत्त प्रकाशित केले होते.
अनेक महिने झाले तरी या निविदेची प्रक्रिया पुढे जात नसल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जे योग्य आहे त्या पद्धतीने निविदेचे काम पुढे न्या आणि ठेकेदारांच्या पात्र अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. कगदपत्रांच्या छाननीनंतर आमदारांकडून ज्या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात होता. तोच ठेकेदार पात्र ठरल्याने आमदारांवर मोठी नामुष्की ओढावली. तसेच आमदारांच्या ठेकेदारापेक्षा पात्र ठेकेदाराने नऊ कोटी रुपयांनी खर्च कमी दाखविल्याने महापालिकेच्या निधीची बचत झाली.
राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून, अनेकदा महापालिकेत खेटे मारूनही आमदांना त्यांच्या मर्जीतला ठेकेदार पात्र ठरवता आली नाही, त्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात आयुक्तांना फोन करून थेट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. अन्य अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग दाखल करून अशी धमकी दिली. आमदारांच्या या धमकीनंतर प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली असून, ही वागणूक योग्य नाही अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.