Muralidhar Mohol Pune News : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत. सरचिटणीस या नात्याने त्यांच्याकडे एक नवी जबाबदारी येऊन पडली आहे. राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातल्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे. या निवड प्रक्रियेसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूर, चंद्रपूर व अकोला या तीन जिल्ह्यातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड करण्याच्या प्रक्रियेचे प्रभारी म्हणून पुण्याचे माजी महापौर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसाठी मोहोळ यांच्याकडे नागपूर,चंद्रपूर आणि अकोला या तीन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. साहजिकच त्यांच्याकडे नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर ग्रामीण या चार तसेच अकोला शहर आणि अकोला ग्रामीण या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिघेजण या जिल्ह्याचे नेते आहेत. या तीन प्रमुख नेत्यांच्या जिल्ह्यात जाऊन प्रभारी म्हणून काम करण्याचे कठीण काम मोहोळ यांना पार पाडावे लागणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) आणि हंसराज आहिर हे दोन दिग्गज नेते आहेत. या जिल्ह्यातही मोहोळ यांना प्रभारी म्हणून भूमिका पार पाडावी लागणार आहे. तुलनेने अकोला शहर आणि अकोला ग्रामीण यामध्ये फारशी अडचण नाही. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते नाहीत. मात्र, मोहोळ यांचा खरा कस चंद्रपूर आणि नागपूर या दोन जिल्ह्यात लागणार आहे.
अर्थात प्रभारी या नात्याने त्या-त्या संबंधित जिल्ह्यात जाऊन जिल्ह्यातील कार्यकारिणी, इतर पदाधिकारी आणि खासदार आमदारांशी भूमिका समजावून घेत जिल्हाध्यक्षांची निवड करायची आहे. संबंधित जिल्ह्यातील आलेल्या अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करायचा आहे. एकूण राजकारण पाहता निवडणुकीची ही मोठी अवघड प्रक्रिया मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पार पाडावी लागणार आहे.
येत्या दहा जूनपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण होणार आहेत. येत्या दोन वर्षात राज्यात पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे या नियुक्त्यांना विशेष महत्व आहे. भाजपाची यंत्रणा देशभर काम करते. राज्यातील कोणत्याही राज्यात संघटनात्मक निवडणूक असली तरी प्रदेशाध्यक्षांना राज्यातील संघटनात्मक निवडणुकांचा संपूर्ण अहवाल केंद्रीय समितीला द्यावा लागतो. त्यामुळे केंद्रीय समितीने ठरवून दिलेल्या कालमर्यादेतच निवडणुका पूर्ण कराव्या लागतात.
(By- Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.