Pune BJP Political News : मुरलीधर मोहोळांना 'ओव्हरटेक' करत श्रीनाथ भिमाले दिल्लीला जाणार का ?

BJP News : गिरीश बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्याच्या लोकसभेसाठी मोहोळांकडे पाहिले जात होते.
Pune BJP Political News
Pune BJP Political NewsSarkarnama

Pune : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी महत्वाकांक्षी अभियान असलेल्या 'महाविजय २०२४' साठी पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद देत कोथरुड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणूनही माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर एक महिन्यापूर्वी जबाबदारी सोपविण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच याची घोषणा केली होती. (Latest Marathi News)

तसेच बावनकुळेंनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले नेते भाजपचे संभाव्य उमेदवार ठरु शकतील असेही जाहीर केले होते. त्यामुळे मोहोळ हे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार असणार का याविषयीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पण आता महिन्यातच मोहोळांकडील लोकसभा निवडणुकासाठीच्या समन्वयकाची जबाबदारी काढून घेत ती पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे सोपवली आहे. यामुळे भिमालेंनी मोहोळांना 'ओव्हरटेक' केले याची चर्चा रंगली आहे.

Pune BJP Political News
Pune BJP News: भाजप शहराध्यक्षांचा पाय मुरगळला अन् पालकमंत्री झाले 'डॉक्टर'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ भिमाले यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय पुणे लोकसभा अंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणूनही भिमाले काम पाहणार आहेत. भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekahr Bawankule) यांच्या हस्ते हे नियुक्तीचे पत्र पुण्यात स्विकारले. विशेष म्हणजे यावेळी मुरलीधर मोहोळही उपस्थित होते.

पुणे लोकसभा(Pune Loksabha) निवडणुकीसाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवून तेच पुढे खासदारकीचे उमेदवार असल्याच्या वावड्या उठत असताना पुन्हा नव्याने श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती झाल्याने भिमाले मोहोळ यांना चितपट करून लोकसभा उमेदवारीचे मैदान मारणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Pune BJP Political News
Solapur NCP President: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नेमले सोलापूरचे शिलेदार; साळुंखे, तांबोळींकडे सुत्रे

मोहोळांवर वाढत्या जबाबदाऱ्या...

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol) यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय 2024’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली होती. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्रही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.

यानंतर गिरीश बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्याच्या लोकसभेसाठी मोहोळांकडे पाहिले जात होते. पण आता अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच आता मोहोळांकडची लोकसभा समन्वयकाची जबाबदारी काढून घेत भाजपने श्रीनाथ भिमालेंकडे दिली आहे. हा एकप्रकारे मोहोळांना धक्का मानला जात आहे.

मोहोळांचे 'हे' प्लसपॉईंट....

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवणार असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे समजले जातात. फडणवीस आणि मोहोळांची घनिष्ट मैत्री देखील आहे. त्यामुळे २०२४ साली पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ लोकसभा लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी देखील मोहोळ यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिल्याची चर्चा पुण्यात आहे. अशातच भिमाले यांच्या निवडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आमदारकीच्या तिकिटाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भिमालेंच्या गळ्यात थेट लोकसभेची माळ पडणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

बावनकुळे काय म्हणाले होते...?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची आठ जून रोजी नियुक्ती केली होती. खासदार, आमदारकीचे उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहण्यात येत होते, अशा पदाधिकाऱ्यांचा निवडणूक प्रमुखांच्या यादीत समावेश होता. मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्याने त्या पदाधिकाऱ्यांचा उमेदवारीचा पत्ता कापल्याची चर्चा भाजप आणि राजकीय वर्तुळात होती. मात्र, बावनकुळे यांनी याच निवडणूक प्रमुखांचा 'पुढचे यशस्वी नेते' असा उल्लेख केल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Pune BJP Political News
Devendra Fadnavis News : 'सुपर स्पेशालिटी' फसलेल्या 'या' जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आणखी एक भूमिपूजन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com