Akola : नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांपैकी आरोग्य सुविधा महत्वाची मानली जाते. याच दृष्टीने अकोल्यात उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निव्वळ शोभेची वस्तू बनलेली असताना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणखी एका रुग्णालयाच्या भूमिपूजनाची तयारी भाजपने चालविली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्या खांद्यावर या कार्यक्रमाची धुरा सोपविण्यात आली आहे.
शिवापूर येथे ५०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मोठ्या निधीतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. डाबकी मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पणही फडणवीस करणार आहे. मात्र ,या साऱ्या गडबडीत सत्ताधाऱ्यांना पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा विसर पडलेला दिसत आहे. १५० कोटी रुपये खर्च करून अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. मात्र दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतरही या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधा कार्यान्वित झालेल्या नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
सुमारे २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयांच्या भिंतींवर व साधनसामग्रीवर आता धुळीचे थर जमले आहेत. अकोल्यातील एकाही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीला या रुग्णालयासंदर्भात काहीही देणेघेणे नसल्याचे यावरून दिसून येते. २०१४ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारनेच केंद्राच्या मदतीने राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली होती. यातून अकोला व यवतमाळ जिल्ह्याला रुग्णालय मिळाले. २०१६ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले आणि २०१९ मध्ये रुग्णालयांचे बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, रुग्णालयाच्या चार भिंती उभारण्यापलीकडे काहीही झाले नाही.
सद्य:स्थितीत अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा कारभार चालविण्यासाठी दीड हजारावर मनुष्यबळाची गरज आहे. मात्र आवश्यक त्या पदांची भरती करण्यास सरकार तयार नाही. अकोला, यवतमाळ, औरंगाबाद आणि लातूर या चारही ठिकाणच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या इमारती बनून तयार आहेत. मात्र, त्यापैकी एकाही रूग्णालयाचे काम संपूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.
पश्चिम विदर्भातील महत्वाचे शहर म्हणून अकोल्याकडे पाहिले जाते. अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजही वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यातून रुग्ण येतात. मराठवाड्यातील(Marathwada) जालना व हिंगोली जिल्ह्यातूनही रुग्ण येत असल्याच्या नोंदी आहेत. अशात सुपर स्पेशालिटी रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरले असते. परंतु सरकारी अनास्थेची लागण झाल्याने पुन्हा एकदा अकोला एका मूलभूत सुविधेपासून वंचित राहिले आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू व्हावे म्हणून भाजपाचे नेते तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आत्मक्लेश आंदोलनही केले होते. रुग्णालयासाठी जनसत्याग्रह संघटनेने सेल्फी आंदोलनही केले. परंतु कुणालाही हे रुग्णालय सुरू व्हावे असे वाटताना दिसत नाही.
कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रांसप्लांट), एंडोक्राइनोलॉजी, कार्डियोलॉजी, सीटीव्हीएस, न्युरोलॉजी, न्युरो सर्जरी, सीटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, इको-कार्डिओग्रॅम, टु-डी ईको, कलर डॉप्लर, थ्रीडी सोनोग्राफी आणि डिजिटल एक्स-रे अशा सुविधा सुपर स्पेशालिटीतून रुग्णांना मिळु शकतात. परंतु केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले खासदार संजय धोत्रे यांच्यासह विधानसभेचे पाच व विधान परिषदेचे चार आमदार असतानाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच ‘व्हेंटिलेटर’वर आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.