
पिंपरी : क्रिकेटच्या (Cricket) सामन्यांत व त्यातही ट्वेंटी-२० प्रकारात `चिअर गर्ल्स`चे (Cheer Girls) फॅड देशात पहिल्यांदा आले, तेव्हा ते मनोरंजक वाटले. नंतर हे लोण ग्रामीण भागातील क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत पोचले. आता, तर या चिअर गर्ल्स थेट गावच्या जत्रेतील बैलगाडा शर्यतीच्या (Bullock Cart Race) घाटात थिरकू लागल्या आहेत. शनिवारी (ता.२ एप्रिल) पुणे जिल्ह्यातील पांगरीच्या (ता. खेड) जत्रेत बैलगाडा शर्यतीच्या घाटात त्या देशी अंदाजात ठुमकताना दिसल्या. यानिमित्ताने प्रथमच गावच्या जत्रेतील बैलगाडा शर्यतीच्या घाटात त्यांचे दर्शन झाले. आता ही टूम गावोगावी जाणार असल्याचे संकेत लगेचच मिळाले आहेत.
क्रिकेट सामन्यांतील चिअर गर्ल्स या विदेशी आहेत वा देशी असल्या, तरी त्यांचा अंदाज व पेहराव हा तोकड्या व कमी कपड्यांमुळे विदेशीच आहे. मात्र, पांगरी गावच्या जत्रेत बैलगाडा घाटातील या चिअर गर्ल्स देशी अवतारात होत्या. त्यांनी नऊवारी घातली होती. त्यांच्या नाकात नथ व हातात चूडाही होता. पांगरी गावच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शितोळे यांची ही कल्पना. त्यांनी ग्रामीण भागातील क्रिकेटच्या सामन्यांत या चिअर गर्ल्स पाहिल्या. त्यातून त्यांना कोरोनामुळे दोन वर्षे ब्रेक लागलेल्या गावच्या जत्रेत त्या आणण्याची कल्पना सुचली. असे त्यांनी स्वतच रविवारी (ता.३ एप्रिल) 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयामुळे गेली सात-आठ वर्षे जत्रेतील बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने बळीराजाची हा शौकही थांबला होता. नुकतीच ही बंदी सशर्त का होईना उठली. ही संधी साधून चिअर गर्ल्स बैलगाडा घाटात आणायचे ठरवले. तसा प्रस्ताव गावच्या जत्रा कमिटीपुढे ठेवला. तो त्यांनी मंजूर केला आणि त्यामुळे गावच्या जत्रेत पहिल्यांदा चिअर गर्ल्स या बैलगाड्य़ाची बारी बसल्यानंतर चिअर करताना प्रथमच दिसल्या, असे शितोळे म्हणाले. पुणे येथील एका इव्हेंट कंपनीच्या या चिअर गर्ल्स होत्या. फक्त त्यांना देशी अंदाजात यायची अट घातली, असे शितोळे यांनी सांगितले. एरव्हीही ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या तमाशा, भारूड वा नाटकात महिला काम करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पांगरी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला श्री रोकडोबा महाराजांचा उत्सव साजरा झाला. त्यानिमित्त बैलगाडा शर्यती झाल्या. त्यात घाटात स्वतंत्र स्टेजवरील चिअर गर्ल्स आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यामुळे क्रिकेटचाच सामने पहायला आलोत की काय, असा समज काहीवेळ बैलगाडा शौकिनांचा झाला होता. नऊवारी या ग्रामीण पोषाखातील या चिअर गर्ल्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाल्या. आता राहिलेल्या जत्रा हंगामात इतर गावांत त्या दिसल्या, तर नवल वाटायला नको. कारण कालच्या त्यांच्या पांगरीतील दर्शनानंतर चाळीसेक गावांतून शितोळे यांना फोन आले. चिअर गर्ल्स कोठून आणल्या याची विचारणा त्यांनी केली. तसेच आमच्याही गावात त्यांना आणायचे आहे, असे त्यांनी शितोळेंना सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.