Pune Political News : संघर्ष केल्यानंतरच यश मिळत असते. याचे चांगले उदाहरण म्हणजे देशातील मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाचा मोकळा झालेला मार्ग आहे. कोर्टाने या शाळेच्या इमारतीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्यास मान्यतादेखील दिलेली आहे. याच पद्धतीने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आनंदाने मोकळा झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारला दिला आहे.
महात्मा फुले यांचा स्मृतिदिन, समतादिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षीचा महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण समारंभ भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या भुजबळांनी उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री यासह अनेक पदांवर काम केलेले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही भुजबळ मंत्रिमंडळात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना भुजबळ यांनी पाठिंबा दिला. त्याचे बक्षीस म्हणून शिंदे-फडणवीस- अजित पवार सरकारमध्ये त्यांना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यात काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये भुजबळांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात भूमिका घेतली. ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात विरोध केला आहे. राज्य सरकारमध्ये असलेले एकही मंत्री मराठा-ओबीसी आंदोलनावर बोलणे टाळत असताना भुजबळांनी मात्र जरांगेंवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाबाबत भुजबळ करत असलेल्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे त्यांचे कानदेखील टोचले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही भुजबळांशी संवाद साधून शांत राहण्यास सांगितले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता भुजबळ (Chhagan Bhujbal) आपल्याच सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. समता परिषदेच्या कार्यक्रमात फुले स्मारकासाठी निधी उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या मंत्र्यालाच निधीसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असेल, तर इतरांनी कोणाकडे जायचे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. भुजबळांच्या इशाऱ्यामुळे सत्ताधारी म्हणून जबाबदारी संभाळणारे आणि आमच्यात काहीही भांडण नाही, असा दावा करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.