Maharashtra Political News: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून नाराजीनाट्य घडत आहे. महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. तसेच, शरद पवारसाहेबांच्या यांच्या राष्ट्रवादीकडे अनेक इच्छुकांचा ओढा असल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील चिंचवडमधील नेते, नाना काटे यांनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे.
पिंपरी-चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला आहे. तर, नाना काटे हे चिंचवडमधील अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे खंदे समर्थक आहेत. 2023 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली होती.
तेव्हा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नाना काटे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाना काटे हे अजितदादांसोबत राहिले.
आता नाना काटे यांनी चिंचवडमधून निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्या भाजपच्या अश्विनी जगताप येथून आमदार आहेत. पण, ही जागा भाजपकडे (BJP) गेल्यास पुढील निर्णय घेऊ, असं नाना काटे यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे नाना काटे यांनी भूमिका स्पष्ट केली नसली, तरी ते 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काटे यांनी 'तुतारी' हाती घेतल्यास अजितदादांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
'साम टीव्ही'शी संवाद साधताना नाना काटे म्हणाले, "मी महायुतीत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड मतदारसंघात काम करत आहे. मी पोटनिवडणूक लढलो. त्या निवडणुकीत एक लाखांचं मताधिक्य मला मिळालं. त्याअनुषंगाने विधानसभा निवडणुकीत मी नक्कीच उभे राहणार आहे."
चिंचवड येथून भाजपचा आमदार आहे. ही जागा पुन्हा भाजपकडे गेल्यास निवडणूक लढणार का? या प्रश्नावर नाना काटे म्हणाले, "मी विधानसभा लढविण्याची तयारी दर्शवली, तेव्हा अजितदादांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सांगितलं. भाजपनं या जागेवर दावा केला, तरी आपणही येथे दावा करू शकतो. कारण, राज्यातील अनेक जागा राष्ट्रवादीकडे आहेत. त्यातील एक दोन जागा भाजपला देऊन चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मागू शकतो."
राष्ट्रवादीला जागा मिळाली नाही, तर 'तुतारी' हाती घेणार का? असा प्रश्न विचारल्यावर नाना काटे यांनी सांगितलं, "मी निवडणूक लढविणार ठाम आहे. ही जागा भाजपला गेली, तरी मी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. पूर्वी राष्ट्रवादी हा पक्ष एकसंध होता. मात्र, मधील काळात दोन गट पडले. आता मी अजितदादांबरोबर आहे. जेव्हा ही जागा भाजपकडे जाईल, तेव्हा पुढील निर्णय घेऊ."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.