Chinchwad Political News : लोकसभा निवडणूक जवळ आली, तरी उद्योगनगरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन्ही खासदारांनी कामाचा अहवाल आपल्या मतदारांना अद्याप दिलेला नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीला आठ महिन्यांचा अवकाश असल्याने हे रिपोर्ट कार्ड शहरातील तिन्ही आमदारांनी देण्याचा तूर्तास प्रश्नच नाही. मात्र,चिंचवड विधानसभा मतदारसंघात साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आपल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचा मोठा दावा भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केल्याने त्याची मोठी खमंग चर्चा आहे.
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा अपवाद वगळता पुणे जिल्ह्यातील कोणाही खासदार, आमदारांनी गेल्या चार वर्षांत किती कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला याचा लेखाजोगा अद्याप जाहीरपणे दिलेला नाही. दोन हजार चारशे कोटी रुपयांची कामे मावळसाठी गेल्या चार वर्षांत मंजूर केली असून त्यातील निम्मी सुरु झाल्याची माहिती नुकतीच आमदार शेळकेंनी दिली.
त्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार नसलेल्या शंकर जगतापांनी पाचशे कोटी रुपयांच्या कामाचा धडाका आपल्या पाठपुराव्यामुळे लावल्याचा दावा केल्याने त्याची चर्चा आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यांची शहराध्यक्षपदी निवड होऊन फक्त सहा महिनेच झाले आहेत. दुसरीकडे शेकडो कोटी रुपयांची कामे केलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी, मात्र अद्याप तसे सांगितलेले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी विधानसभेला चिंचवडमधून लढण्याच्या तयारीचा भाग म्हणून जगतापांनी वरील दावा केल्याची चर्चा आहे. त्यांचे बंधू आणि चिंचवडमधून आमदारकीची हॅटट्रिक केलेले लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे गेल्यावर्षी तेथे पोटनिवडणूक झाली. त्यात लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी निवडून आल्या आहेत. त्यावेळीच शंकर जगतापांचे नाव उमेदवार म्हणून घेतले जात होते. पण,नंतर त्यांची समजूत घालण्यात आली होती.चिंचवडमध्ये ४५० ते ५०० कोटींची ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे तीन महिन्यांपासूनच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी या कामांना मंजुरी दिली असल्याचे शंकर जगताप यांचा दावा आहे.दुसरीकडे हे सर्व रस्ते महापालिकेच्या विकास आराखड्यातील (डीपी) आहेत.
दरम्यान,शंकर जगतापांचा वरील दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी खोडूनच काढला नाही, तर त्यांच्यावर टीकाही केली. महापालिकेच्या नियोजनातील हे रस्ते असून त्याची कामे आता सुरु होणार असल्याने त्याचे श्रेय नगरसेवक नसलेल्यांनी घेऊ नये,असा टोला त्यांनी जगतापांना लगावला.
चालत्या गाडीत बसण्याचा हा त्यांचा प्रयत्न असल्याची कोपरखळी त्यांनी मारली. ही कामे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ती मार्गी लावण्यास आयुक्त तथा प्रशासकांना अजित पवारांनी सांगितले.त्यामुळे त्याच्याशी कसलाही सबंध नसलेल्या जगतापांनी त्यावर आपले नाव चिकटवू नये,असे काटे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.