Pune News : पुणे शहर पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार चांगलेच 'ॲक्टिव्ह मोड'वर आले आहेत. मंगळवारी शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड झाल्यानंतर दुसऱ्या आज दिवशी बुधवारी अवैध धंदे करणाऱ्या आणि अमली पदार्थ तस्कारांची पोलिसांनी परेड काढली. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकांकडून ही परेड काढण्यात आली. (Latest Marathi News)
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारमधील नेत्यांबरोबर गुंडांचे फोटो व्हायरल झाले होते. गेल्या आठवड्यापासून राजकीय पुढाऱ्यांबरोबर हे फोटो येत असल्याने विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासह स्वतः अजित पवार यांचा एका गुंडाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे या नेत्यांना विरोधकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते.
या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी शहरातील सर्व कुख्यात गुंड आणि टोळी प्रमुखांना पोलिस आयुक्त कार्यालयात बोलाविण्यात आले. तेथे त्यांची हजेरी घेण्यात आली. यापुढील काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल असे कोणतेही वर्तन करणार नाही. तसेच त्यामध्ये आपला सहभाग राहणार नाही, अशी हमी या गुन्हेगारांकडून घेऊन त्यांना समज देण्यात आली.
पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी पोलिसांनी शहरातील ड्रग्ज तस्करांना बोलावून त्यांची ओळख परेड घेतली. मटका, जुगार, क्लब, लॉटरी, अवैध पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा यात समावेश होता. जवळपास 60 जणांचा यात समावेश होता.
पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी गुन्हेगारांची परेड घेण्यास सुरुवात केल्याने याचे कौतुक पहिल्या दिवशी नागरिकांकडून करण्यात आले. मात्र, आता दररोज पोलिस अशा पद्धतीने गुन्हेगारांची केवळ ओळख परेड घेण्यामध्येच अडकणार असाल तर उपयोग काय? अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गेली दोन दिवसांत पोलिस गुन्हेगारांना आयुक्त कार्यालयात बोलवत असतील आणि केवळ त्यांना समजावून सांगत असतील तर उपयोग काय? पोलिस आयुक्त कार्यालयात येताना आणि परत आपल्या भागात जाताना हे गुन्हेगार रस्त्याने कशा पद्धतीने जातात? याकडेदेखील पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, असेही काही नागरिकांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.