Rahul Kul vs Ramesh Thorat : दौंड बाजार समीतीत भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यात थेट लढत होणार आहे. या बाजार समितीवर थोरांतांचे वर्चस्व आहे. यावेळी मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा फायदा घेत कुल यांनी थोरांताविरुद्ध दंड थोपटले आहेत. भाजप व मित्र पक्ष पुरस्कृत पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडताना कुल यांनी बाजार समितीत परिवर्तन झाल्यास राज्य शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात आणला जाईल, अशी ग्वाही दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, रासप, आरपीआय या मित्रपक्षांच्या जनसेवा पॅनेलच्या प्रचार शुक्रवारी (ता. २१) सुरू करण्यात आला आहे. यावेळी आमदार कुल म्हणाले, "दौंड बाजार समितीत परिवर्तन करण्याची हीच योग्य वेळ आहे. परिवर्तन झाल्यास केंद्र व राज्य शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात आणला जाईल."
यावेळी आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी दौंड तालुक्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले, "खडकवासल्याच्या पाण्यामुळे दौंड तालुक्याचे चित्र बदलण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे मुळशीचे पाणी आल्यावर हरितक्रांतीला बळ मिळणार आहे. आता राज्य सरकारने उच्चस्तरीय दिवाणी न्यायालयाला मंजुरी दिली आहे. पुढील दोन महिन्यांत दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय, तर सहा महिन्यांत पाटस येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होईल. २०२३ मध्ये हडपसर ते कासुर्डी दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी मिळेल."
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी भाजप सरकारचा फायदा घेण्याचे आवाहन केले. काळे म्हणाले, "भाजपचे केंद्र व राज्यामध्ये सरकार आहे. याचा दौंडमधील नागरिकांनी फायदा घेतला पहिजे. त्यामुळे दौंड बाजार समितीत परिवर्तन करण्याची गरज आहे." माजी नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "सध्या दौंड बाजार समितीचे अस्तित्व दिसत नाही. शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आमदार कुल यांनी मागील सहा महिन्यांत दौंड नगरपरिषदेला ४५ कोटी रुपयांचा विकासनिधी दिला आहे. असाच निधी ते बाजार समितीसाठीही आणू शकतात."
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. आता या निवडणुकीसाठी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनीही पॅनेल उभा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान निर्माण झाले आहे. दौंड बाजार समिती सहकारी संस्थांच्या ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २, हमाल १ अशा एकूण १८ जागा आहे. या जागांसाठी एकूण दोन हजार ६६७ मतदार मतदान करणार आहेत. त्यात सरकारी संस्थेत १ हजार ५६९, ग्रामपंचायत ८७६, व्यापारी १८९ व हमाल ३३ अशा मतदारांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.