

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुण्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या तीन महामार्गाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शहरातील प्रमुख एमआयडीसी जोडण्यासाठी राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. हडपसर-यवत आणि चाकण-शिक्रापूर या मार्गांमुळे पुण्यातील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वाहनचालकांचा ५०-५० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
या प्रकल्पांचे नियोजन अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात आले असून, हे मार्ग आउटर रिंग रोडला जोडले जातील. काही ठिकाणी रस्ता, आउटर रिंग रोड, एलिव्हेटेड रोड आणि त्यावर मेट्रो असे 'चार मजली रस्ते' पाहायला मिळतील. भविष्याचा विचार करून मेट्रोचे प्लॅनिंग यामध्ये इंटिग्रेट केल्यामुळे मेट्रोचा खर्च तब्बल ४० टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच, पुणे ते नाशिक फाटा रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचे विषय संपवून पुढच्या १५ ते २० दिवसांत त्याचेही भूमिपूजन केले जाईल, असे फडणवीस म्हणाले.
पुरंदर विमानतळाबाबत बोलताना ते म्हणाले, विमानतळासाठी आवश्यक ५० टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन पूर्ण झाल्यामुळे विमानतळाचे टेंडर लवकरच काढता येईल. विमानतळाकडे जाण्यासाठी रस्ता आणि मेट्रो दोन्हीची व्यवस्था करण्यासाठी दिवे घाटामध्ये जुळे बोगदे तयार करण्याबाबतच्या फिजिबिलिटीची चाचपणी सुरू आहे. पुण्यातून चारही दिशांना बाहेर पडताना वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल, यावर सरकारचा भर आहे.
'जो राम का नही, वो किसी काम का नही'
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान मंदिरात होत असलेल्या रामरक्षा पठणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, "शेवटी उद्धवजींच्या हे लक्षात आलं की 'जो राम का नही, वो किसी काम का नही', त्यामुळे ते रामाकडे परत गेले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो," असा टोला फडणवीस यांनी लगावला.
तसेच यावेळेस तरी ते थोडी बहुत का होईना रामरक्षा वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपुरात ठाकरेंचे बॅनर काढल्यावरून झालेल्या वादावर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले.
पुण्यात झालेल्या एका आत्महत्या प्रकरणात १४ जणांवर गुन्हा दाखल होऊनही आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या (शिवसेना) एका माजी आमदाराचे नाव असतानाही अटक का झाली नाही, असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "पोलिसांनी या संदर्भात एफआयआर दाखल केला असून पोलीस योग्य तीच कारवाई करतील. या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही. जी कायदेशीर कारवाई आवश्यक आहे, ती पोलीस करतील". असे फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.