Pune News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुणे लोकसभेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी रणनीती आखली जात आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात वातावरण चांगेलच तापले आहे.
काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी फायनल असल्याचे पुढे आल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पूर्वनियोजित बैठकीत लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना धारेवर धरले. (Loksabha Election 2024 News)
बुधवारी सायंकाळी काँग्रेसच्या उमेदवारांची राज्यातील संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी फायनल असल्याची माहिती आहे. धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्येचे समजताच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निष्ठावंतांना संधी दिली नाही तर त्याचे विपरीत परिणाम घडतील, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर निष्ठावंतांना डावलले जात असल्याने शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात याचे पडसाद निश्चित उमटतील, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे, असा थेट सवाल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला.
गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे. सलग ३० वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या आणि पुणेकरांचा कौल घेऊन उमेदवार ठरवा हे पत्र दिले. मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले. मात्र, काँग्रेस (Congress) यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले. ते पत्र जर लेटर बॉम्ब होते मग आता पुढे पहा काय होते. पुढील भूमिका ही कार्यकर्ते, समर्थक, मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल, असेही यावेळी मेळाव्यात बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी स्पष्ट केले.
आताचे स्थानिक नेते आहेत, त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते. अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली. याची आठवणही आबा बागुल यांनी स्थानिक नेत्यांना करून दिली.