Lokmanya Tilak Award Narendra Modi : टिळक स्मारक ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार विरतरण कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत या पुरस्काराची घोषणा केली.
1983 पासून दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचा ४१ वे वर्ष आहे. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे, त्यामुळे या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
1 ऑगस्ट ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी या दोन वर्षात तिसऱ्यांदा पुण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निमंत्रित केले जाणार असल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहे.
दरम्यान, मोदींना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाचा विरोध केला आहे. पुणे शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र पाठवून विरोध केला आहे. मात्र, या पुरस्कारावरुन काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे बोलले जात आहे.
Edited By : Rashmi mane