Pimpri Chinchwad News : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारपासून मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या. त्यात शिरूरमध्ये इतर कोणी इच्छुक नसल्याने विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास नक्की झाले. फक्त अधिकृत घोषणाच काय ती बाकी आहे. कारण स्वत: अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांना पुन्हा तयारीला लागण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सात मतदारसंघाचा आढावा मुंबईत घेण्यात आला. गुरुवारी आठचा घेतला जाणार आहे. त्यातून राज्यातील ४८ पैकी १५ मतदारसंघांवर राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीत दावा करणार असल्याचे दिसून आले. तेथील संभाव्य उमेदवारांची चाचपणी या आढाव्यातून केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती आणि शिरूरची एकत्र तासभर बैठक झाली. प्रथम बारामतीवर चर्चा झाली. त्यामुळे नंतर शिरूरमधील पदाधिकाऱ्यांना तुलनेने कमी वेळ आपले म्हणणे मांडण्यासाठी मिळाला. पक्ष जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सेल अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना या आढाव्याकरिता निमंत्रित करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त अध्यक्ष तुषार कामठे यांनी शिरूरमध्ये मोडणाऱ्या शहरातील भोसरी मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराला या वेळी साठ हजारांचे लीड देऊ, असा दावा केला. गतवेळी तेथे पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) हे तीस हजारांनी पिछाडीवर होते.पण, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपने फोडल्यानंतर आता तेथेच नाही, तर सगळीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे.
तसेच भोसरीत ठाकरे शिवसेनेची(Shivsena) ताकद मोठी आहे. तेथील नेते गेले असले, तरी कार्यकर्ते, मात्र पक्षाबरोबर असल्याने या वेळी चित्र वेगळे असेल, असे ते म्हणाले. तसेच लोकसभेला शिरूर आणि विधानसभेला भोसरी मतदारसंघ अजित पवार गट आणि भाजप या दोघांनाही लढवायचा असल्याने या बेकीचा फायदा आपल्याला होईल, असेही ते म्हणाले.
खासदार कोल्हे हे पक्षाचे स्टार प्रचारक राहणार असल्याने त्यांना राज्यभर फिरावे लागेल. त्यामुळे मतदारसंघातील प्रचाराकरिताही त्यांना वेळ देण्यात यावा, अशी अपेक्षावजा मागणी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली. तसेच या वेळी वातावरण चांगले असून, शरद पवार (Sharad Pawar) नुसते फिरले, तरी त्याचा चांगला परिणाम दिसेल, असे ते म्हणाले.
या वेळी लोकसभाच नाही, तर विधानसभेलाही बदल करू, असे सांगत खेड तालुका अध्यक्ष हिरामणअण्णा सातकर यांनी अजित पवार गटात गेलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना आव्हान दिले. अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहिलेल्यांचा विचार भविष्यात होईल, होईल, असे सूचक विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करीत उपस्थितांना आश्वस्त केले. शरद पवार यांनी मतप्रदर्शन न करता सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.