भाजपमध्ये इनकमिंग; आता माथाडी नेत्याचा प्रवेश

आमदार नसलेल्या मतदारसंघातील एकनाथमामांच्या प्रवेशाने भाजपला पिंपरीत बळ मिळणार आहे.
Laxman Jagtap
Laxman Jagtapsarkarnama

पिंपरी : अडीच महिन्यावर आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्यातही भाजपने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. तर, राष्ट्रवादीची भिस्त ही केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच आहे. भाजपला सत्ता टिकवायची आहे. तर, गेलेली सत्ता राष्ट्रवादीला पुन्हा मिळवायची आहे. म्हणून या दोन्ही पक्षांनी सध्या भरती सुरु केली आहे. त्यात ताजी भरती रविवारी (ता.१५) भाजपमध्ये झाली. राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ मोहिते ऊर्फ एकनाथमामा यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Laxman Jagtap
सत्तेसाठी पटोले तलवार म्यान करतात ; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्य माथाडी बोर्डाचे माजी सदस्य अनुप मोरे, पक्षाचे चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत एकनाथमामांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. मोरे यांच्या प्रयत्नातून ते भाजपमध्ये आले आहेत. तर, कलाटे यांच्याकडे नुकतीच पक्षाने चिंचवडचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ती स्वीकारल्यानंतर पक्षात हा पहिला प्रवेश झाला आहे. एकनाथमामांचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लांडेवाडी भागात प्रस्थ आहे. तर, पिंपरीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. शहरातील बाकीचे दोन्ही आमदार म्हणजे जगताप व भोसरीत महेश लांडगे हे भाजपचे आहेत.

लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. दादा व भाऊ म्हणून कार्यकर्त्यांत ओळखले जाणारे लांडगे व जगताप यांचा त्यांच्या मतदारसंघात वरचष्मा आहे. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघाबाहेर पिंपरीवर लक्ष केद्रीत केले आहे. त्यातून कालचा प्रवेश झाला. आमदार नसलेल्या मतदारसंघातील एकनाथमामांच्या प्रवेशाने भाजपला पिंपरीत बळ मिळणार आहे. एकनाथमामांनीही आपल्या भागात भाजपचे विचार जनमानसापर्यंत पोचवणार असल्याचे प्रवेशानंतर सांगितले. एकनिष्ठेने पक्षकार्य करणार आहे, असे ते म्हणाले. सध्या संपावर असलेल्या एसटी कामगारांना न्याय मिळावा म्हणून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चाहता असल्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. एसटी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यांच्याबरोबर अक्षय मोहिते, प्रशांत मोहिते, विकी कदम, अनंत पडवळ, अजय चव्हाण रवी मोहिते, संदीप कदम, मयूर मोडवे, विनोद पासलकर अजय थोरात, राजू मारटकर आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये आले आहेत.

Laxman Jagtap
बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली; नितेश राणेंचा घणाघात

दरम्यान, सत्ता टिकविण्यासाठी तसेच ती पुन्हा मिळवण्याकरिता भाजप व राष्ट्रवादीत शहरात रस्सीखेच सुरु आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षांत इनकमिंग घडवून आणले जात आहे. सध्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होत आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे अपात्र ठरणार असल्याने नगरसेवकांचे इनकमिंग, आऊटगोईंग सध्या होत नाही आहे. मात्र, पदाची मुदत संपताच आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर अपात्र ठरण्याची भीती उरत नसल्याने या वर्षाच्या शेवटास व नवीन वर्षाच्या सुरवातीस नगरसेवकांचेही प्रवेश सुरु होणार आहेत. त्याचे संकेत काही नगरसेवकांनी अगोदरच दिले आहेत. दरम्यान, सत्तेसाठी संघर्ष सुरु असलेल्या पालिकेतील आजी, माजी पक्षांतच हे इनकमिंग होत आहे. पालिकेत भगवा फडकावण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेत, मात्र असे मोठे प्रवेश होताना दिसत नाही. उलट तेथून आऊटगोईंग सुरु आहे. त्यांचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी धनुष्याबाण सोडून नुकतेच हाती कमळ घेतले आहे. तर, काही माजी नगरसेवकांनी कमळ सोडून हातावर घड्याळ बांधले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com