Pune News : महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले आहे. या प्रकरणांमध्ये आता धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकाजवळ आल्याने भाजप आणि काँग्रेसमधील श्रेयवादाची लढाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. महापालिकेने गोखलेनगर, जनवाडी या प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये असलेल्या आशानगर भागात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे.
स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचे उद्घाटन ठेवले होते. याला विरोध करत काँग्रेसने अजित पवार येण्यापूर्वीच उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. टाकीचे उद्घाटन करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली व मोठ्या प्रमाणात वाद झाला.
या दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता आमदार रवींद्र धंगेकर यांनी आम्हाला उद्घाटनस्थळी का जाऊ दिले जात नाही, असा सवाल करत त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओचे भांडवल करत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धंगेकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरती महापालिकेतल्या कर्मचारी संघटनांनी देखील संताप व्यक्त करत आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग प्रमुखांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Edited by Sachin Waghmare)