Pune Political News: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा व्हिडिओ भाजपकडून व्हायरल केला जात आहे. जनवाडी, आशानगर येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे अनौपचारिक उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या आमदार धंगेकर यांनी महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर माजी सभागृह नेते गणेश बिडकरांनी धंगेकरांना मस्ती आल्याचा घणाघात केला आहे.
धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला केलेल्या शिवीगाळीचा गणेश बिडकरांनी (Ganesh Bidkar) कडक शब्दात समाचार घेतला आहे. बिडकर म्हणाले, आमदारकी मिळाली म्हणजे शिवीगाळ करण्याचे लायसन्स मिळाले का? ही मस्ती आली कुठून? कसब्यासाठी काही करता येत नसल्याची हतबलता यामधून दाखविली जात आहे. हा मस्तीवालपणा कसबाच उतरवेल, असा इशाराही बिडकरांनी यावेळी दिला. दरम्यान, या प्रकरणानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये 'सोशल मीडिया वॉर' सुरू झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता भैरट यांनी या पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ केला होता. या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण व्हावे, यासाठी बहिरट यांनी अनेक दिवस पाठपुरावा केला. टाकी बांधण्यासाठी पालिकेला जागा उपलब्ध होत नसल्याने आशानगर सोसायटीमधील सदस्यांची चर्चा करून ही जागा पालिकेला मोफत कशी मिळेल त्यासाठी परत यांनी प्रयत्न केले. तसेच या जागेचे बक्षीसपत्र करताना आपल्या खिशातील पैसे टाकून ही जागा पालिकेच्या ताब्यात दिली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय बहिरट यांना न देता भाजपने या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे आमदार धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला डावलून याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या अगोदर आम्ही उद्घाटन करू, अशा इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानुसार काँग्रेसचे पदाधिकारी तेथे उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी पोलिस अधिकारी, महापालिकेतील कर्मचारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या बाचाबाची झाली. यावेळी आमदार धंगेकरांनी संबंधित अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.