
Suresh Kalmadi News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराच्या आरोपांतून पुण्याचे माजी खासदार व स्पर्धा संयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी यांना सीबीआय पाठोपाठ ई़डीनेही क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर ते घोटाळ्याच्या आरोपांतून निर्दोष ठरले आहेत.
कलमाडी यांच्याशिवाय आयोजन समितीचे तत्कालिन सरचिटणीस ललित भानोत, तत्कालिन महासंचालक व्ही. के. वर्मा आणि कलमाडी यांचे खासगी सचिव शेखर देवरुखकर यांनाही क्लिनचीट दिली आहे. ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट दिल्ली न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे या प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप संपुष्टात आला आहे.
ऑक्टोबर 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या संयोजक समिताचे अध्यक्ष सुरेश कलमाडी होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे 1 हजार 700 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी हा तपास केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपविला होता. त्यानंतर 25 एप्रिल 2011 रोजी सीबीआयने त्यांना अटक केली होती.
क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करुन कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत, व्ही. के. वर्मा, शेखर देवरुखकर यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सीबीआयच्या हाती ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे सीबीआयने कलमाडींना 120 ब आणि 420 कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
तेव्हापासून ते जवळपास 9 महिने दिल्लीच्या तिहार तुरुंगात होते. त्याच दरम्यान, सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदविला होता. पण 2014 मध्ये सीबीआयने त्यांचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, "तपासादरम्यान कोणतेही गुन्हेगारी पुरावे समोर आले नाहीत." तसेच एफआयआरमधील आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत असेही म्हटले होते. आता ईडीने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.