पिंपरी : शिवसेनेचे (shivsena) माजी पुणे जिल्हाप्रमुख गजानन पोपट चिंचवडे (Gajanan Chinchwade) (वय ५३, रा. चिंचवडगाव) यांचे शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मावळचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. गेल्या तीन दिवसांत शिवसेनेशी संबंधित दोन गजाननांचे निधन झाले आहे. मावळचे पहिले खासदार शिवसेनेचे गजानन धरमशी बाबर यांचेही ता. २ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. (Former Shiv Sena pune district chief Gajanan Chinchwade dies of heart attack)
अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेल्यानंतर चिंचवडे यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला अन् ते तिथेच कोसळले. जवळच्या खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. पण, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यामागे पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे व दोन मुलगे असा परिवार आहे.
तोंडावर आलेली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपकडून लढण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. कुणाच्याही वादात न पडणारे असे मितभाषी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. दोनदा नगरसेवक राहिलेल्या त्यांच्या पत्नीला स्थायी समिती सदस्य व गटनेते म्हणून संधी न दिल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत हातात कमळ घेतले होते. तरीही त्यांनी शिवसेना वा त्यांच्या इतर कुणावरही टीका केली नव्हती.
प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यामुळे चिंचवडे यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. तत्कालीन पीसीएमटीचे ते सदस्य होते. नंतर ते पालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य झाले होते. श्रीरंग बारणे हे शिवसेनेते गेले, त्यानंतर चिंचवडे यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. खासदार बारणेंचे ते एकनिष्ठ व विश्वासू सहकारी बनले होते. मावळ लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
जिल्हाप्रमुख म्हणून ही जबाबदारी असतानाच त्यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये शिवसेना सोडली होती. हमखास विजयी होईल, असा उमेदवार असल्याने खासदार बारणेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडे यांना पक्षात घेतले होते, त्यामुळे चिंचवडे यांच्या अकाली निधनामुळे भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.