Vanraj Andekar Murder Case : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय २६) याच्यावर बुधवारी (ता. २०) सकाळी भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील बालाजीनगर परिसरातील बसस्थानकाजवळ संविधान चौक परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अक्षय म्हस्के याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून आरोपी पसार झाले. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंदेकर आणि कोमकर-म्हस्के टोळ्यांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
अक्षयचा भाऊ आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. हत्येसाठी मध्य प्रदेशातून पिस्तुले आणि काडतुसे आणण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी त्याला अटक करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारी वर्चस्वातून हा कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २१ आरोपींविरुद्ध १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.