
Pune News : गोपीनाथ मुंडे यांचा आज 11 वा स्मृतीदिन. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी केवळ विधानसभेत नव्हे तर रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कशी भूमिका बजावली, याचा एक थरारक किस्सा आजही पुणेकरांच्या लक्षात आहे.
ही घटना आहे 90 च्या दशकातील. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं होतं. गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री बनले. एकेकाळी बीड जिल्ह्यातील परळीच्या मातीतून उगम पावलेले हे नेते आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा मजबूत चेहरा झाले होते.
त्याच दरम्यान, पुणं झपाट्यानं बदलत होतं. आयटी, शिक्षण आणि व्यवसाय यामुळे शहराचं रूप पालटत होतं आणि त्याचबरोबर पब कल्चर नावाची एक नवीन जीवनशैली शहरात रुजू लागली होती. या बदलत्या पुण्यात 'ब्लॅक कॅडिलॅक' नावाचा एक पब नगर रोडवर उगम पावला. एकदम स्टायलिश, आकर्षक आणि तरुणाईचा अड्डा बनलेला हा पब, थोड्याच दिवसांत चर्चेचा विषय ठरला. पण त्याचबरोबर इथून सुरुवात झाली ती गुन्हेगारीच्या सावटाची.
या पबमुळे परिसरात गोंधळ वाढला, गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आणि मुंबईत सुरू असलेलं अंडरवर्ल्डचं सावट पुण्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा होऊ लागली. एका प्रसिद्ध पबवर गोळीबार झाला, काहीजण थोडक्यात बचावले, आणि शहराच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ही माहिती थेट मंत्रालयात पोहोचली. गोपीनाथ मुंडे यांना ही गोष्ट खटकली.
एका रात्री गोपीनाथ मुंडे पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत तत्कालीन समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे होते. नगर रोडच्या दिशेने जात असताना दिलीप कांबळेंनी ‘ब्लॅक कॅडिलॅक’ पबविषयी चर्चा केली. गोपीनाथ मुंडे क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा त्या पबकडे वळवला. कोणतीही पूर्वसूचना न देता, थेट गृहमंत्री आपल्या गाड्यांसह त्या पबच्या आवारात घुसले.
पबमधील व्यवस्थापक, स्टाफ काही वेळ सुन्न झाले. कोणालाही काही उमगायच्या आत, गोपीनाथ मुंडेंचा रुबाबदार आवाज पबच्या आत घुमला आणि सर्वांनाच धक्का बसला... "महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट पबवर रेड टाकली!"... याची चर्चा महाराष्ट्रभर झाली. हा क्षण पुणेकर कधीच विसरले नाहीत. एक डॅशिंग गृहमंत्री म्हणून मुंडे यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
गोपीनाथ मुंडे यांनी केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर कायद्याच्या रक्षकाच्या भूमिकेतून स्वतः कृती केली. कोणतीही दिखावा नाही, कोणताही प्रचार नाही, फक्त एक थेट, बेधडक निर्णय. आज पुण्यातील वाढतं पब कल्चरआणि त्यातुन निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होत असताना, गोपीनाथ मुंडेंची ती एका रात्रीची कारवाई आठवते. त्यांनी दाखवलेली तत्परता, निर्णयक्षमता आणि धोरणात्मक ताकद आजच्या काळात किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.