Pune News : मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याने आणि मराठा व इतर समाजात तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्तेंविरुद्ध मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यासाठी त्यांनी राज्यभर पोलिसांत तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत अशा तीन तक्रारी त्यांनी दिल्या आहेत. पण, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या निकटच्या वर्तुळातील समजले जाणारे सदावर्ते यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.
मनोज जरांगे-पाटलांची(Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीतील १४ ऑक्टोबरची सभा हिंसक होईल, म्हणून तिला परवानगी न देता जरांगेंना अटक करा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली होती. दरम्य़ान, ही सभा जंगी यशस्वी होताच मराठा मोर्चाने सदावर्तेंकडे आपला मोर्चा वळवला. राहुल व्यंकटराव यादव (रा. पुनर्वसन सावरगाव,ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी परवा कळंब पोलिस ठाण्यात सदावर्तेंविरुद्ध पहिली तक्रार करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
त्यांनी न्यूज चॅनलला मुलाखती देऊन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यात म्हटले आहे. मात्र, दोन दिवसांनंतरही त्याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा नोंदविलेला नाही. त्यामुळे अटकेची कारवाई, तर दूरच राहिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, कळंबनंतर सकल मराठा समाज, मैंदा (ता.जि. बीड) यांच्या वतीने पिंपळनेर (जि. बीड) पोलिस ठाण्यात दुसरी तक्रार सदावर्तेंविरुद्ध देण्यात आली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याद्वारेही करण्यात आली आहे. तो केला नाही, तर मैंदा येथे मराठा आऱक्षण मिळण्यासाठी पाण्याच्या टाकीवर साखळी उपोषण करणारे आंदोलक तेथून खाली उड्या घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.(Gunaratna Sadavarte)
सदावर्तेंविरुद्ध तिसरी तक्रार पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिस ठाण्यात सतीश काळे यांनी सोमवारी दिली. वकिली सनदेचा गैरवापर सदावर्ते समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. अशाच बेकायदेशीर आंदोलनामुळे त्यांची ही सनद दोन वर्षांसाठी कोर्टाने रद्द केल्याकडेही त्यात लक्ष वेधण्यात आले आहे.
जरांगे-पाटलांच्या १४ तारखेच्या अंतरवाली सराटीच्या सभेला जत्रा संबोधून त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाची बदनामी करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.