पुणे : जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सध्यातरी करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr.Rajesh Deshmukh) यांनी आज स्पष्ट केले. हेल्मेट सक्ती नसली तरी हेल्मेट परिधान करण्याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने शहरभरात खळबळ माजली होती. राज्य सरकारने गुरूवारी मास्क वापरण्याबाबतचे निर्बंध हटविले आहेत.सरकारने मास्कचे निर्बंध हटवून हेल्मेटची सक्ती केल्याची भावना निर्माण झाली होती.या पाश्र्वभूमीवर आज सकाळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. दुचाकी वापरताना हेल्मेट घातले नसल्यास शिक्षेस पात्र राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ३१ मार्च रोजी जारी केले होते.
या संदर्भात डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘ जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती केलेली नाही. परंतु दुचाकी वाहन चालवताना नागरिकांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.दरम्यान, हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येकी ४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचे ५ गट तयार करण्यात आले आहेत. ते अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याचे फायदे समजून सांगणार आहेत.’’
प्रबोधनाची मोहीम शुक्रवार (ता.१) एप्रिलपासून नियमित राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.