

Gaja Marne : कुख्यात गुंड गजानन मारणेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 आणि 16 जानेवारीला शहरात येण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मारणे याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे त्याच्यावर पुणे शहरात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. निवडणुकीच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी आणि न्यायालयाने दिलेल्या अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे. मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग 10 मधून महापालिकेची निवडणूक लढवत आहे.
या निवडणुकीत पत्नीला एकट्याला प्रचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुण्यात जाऊन प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचार करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे ठराविक कालावधीसाठी पुण्यात जाण्यास परवानगी मिळावी,’ असा अर्ज मारणे याने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत येथील सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मारणे याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गजा मारणेला अलिकडेच न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना काही अटी व शर्थी घातल्या होत्या. यात पुणे शहर बंदीचीही अट होती. त्यामुळे पत्नीला निवडणुकीत विजयी करण्यासाठी तो शहरालगतच्या गावांमधून सक्रिय झाला होता. शहरालगतच्या गावातून तो कोथरूडमधील मतदारांना फोन करून प्रचार करत असल्याचे सांगितले जात होते. याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्याने या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. मात्र आता गजा मारणे याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
संगणक अभियंत्याला कोथरूडमध्ये भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह 6 जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर मारणे आणि टोळीवर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारणे याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मात्र त्यास पुण्यात येणास बंदी घालण्यात आली होती.
आता न्यायालयाने पोलिसांच्या देखरेखीखाली आणि कायदा-सुव्यवस्थेला धक्का न लागेल अशा अटींवर गजा मारणेला पुण्यात येण्यास हिरवा कंदील दिला आहे. या कालावधीत मारणे याला कोणतीही सार्वजनिक सभा, समर्थकांशी संपर्क किंवा शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे त्यांना बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे पुणे पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, 15 आणि 16 तारखेला शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.