Baramati, 01 November : बारामतीतून विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहायचं नाही, असे मी सुरुवातीला ठरवलं होतं. मला महाराष्ट्रातून तीन ठिकाणांहून निवडणूक लढविण्याची ऑफर होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 01 नोव्हेंबर) बारामतीत बोलताना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केलेल्या खुलाशाचा संदर्भ काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील भाषणाशी आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीकडून उमेदवार होत्या. बारामतीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ‘बारामीत विरोधात निकाल गेला तर मी विधानसभेला मी वेगळा निर्णय घेईन, असे विधान केले होते.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांच्या निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती. अजित पवार यांनीही त्यावर सोईस्कर मौन बाळगले होते. मात्र, बारामतीतील (Baramati) महिला कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी गाडी अडवून बारामतीतून निवडणूक लढविण्याबाबत आग्रह केला होता. त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी होकार दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत अजित पवार यांचे नाव जाहीर झाले होते.
लोकसभा निवडणुकीतील अनुषंगानेच अजित पवार यांनी ही जुनी गोष्ट पुन्हा मांडली आहे. अजित पवार म्हणाले, माझी प्रशासनावर जी पकड आहे, तशी ती इतर कोणाची नाही. भावनिक होऊन काय करायला गेला, तर तो तुमचा अधिकार आहे, असे सांगून भावनिक आवाहनाकडे लक्ष देऊ नये, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
सुरुवातीला मी म्हणत होतो की, बारामतीत मी उभाच राहत नाही. मला, महाराष्ट्रातून तीन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी ऑफर होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरूर-हवेली या दोन मतदारसंघातून तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा तेथील लोकांचा आग्रह होता, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तुम्ही एवढी विकास कामं केली आहेत, आम्ही तर तुम्हाला बिनविरोध निवडून दिलं असतं, असं तेथील कार्यकर्ते सांगत होते. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं, असा हा प्रकार आहे, अशी खंतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.