Pune News : आपल्या कारनाम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता खेडकर कुटूंबाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी खेडकर कुटुंबियांचे संबध असल्याचे समोर आले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी तब्बल 12 लाख रूपयांची देणगी दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांची राज्य सरकारने गेल्या वर्षी नियुक्ती केली होती. या पदावर नियुक्ती झाल्यापासून खेडकर यांनी आपल्या विविध कारनामे केले असल्याची माहिती राज्य सरकारकडे पाठविलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हा अहवाल पाठविला होता. नियुक्तीच्या ठिकाणी स्वतंत्र केबीन पाहिजे, त्यामध्ये अद्यावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्या आग्रही होत्या. आपल्या खासगी ऑडी कारवर सरकारी लाल-निळा अंबर दिवा लावून खेडकर फिरत असल्याचेही या अहवालामध्ये म्हंटले होते.
जिल्हाधिकारी (Collector) दिवसे यांनी सरकारला पाठविलेल्या अहवालामध्ये पूजा खेडकर यांना प्रशिक्षणासाठी इतर जिल्ह्यात पाठवावे, अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली होती. त्याची दखल घेत खेडकर यांना वाशिम जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना त्रास देणाऱ्या पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकाविले असल्याचेही समोर आले होते.
त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतरांवर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएएसची परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे दिल्लीतून त्यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.
आपल्या चुकीच्या कारभारामुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा हे प्रकरण सुरू झाल्यापासून सुरू आहे. त्यातच आता खेडकर कुटुंबाने पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला लाखो रुपयांची देणगी दिल्याचं समोर आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चेकद्वारे ऑक्टोबर 2023 मध्ये ही देणगी देण्यात आली आहे.
तसेच पंकजा मुंडे (Pankaja Mudhe) यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट दिला होता. त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष होते.
दरम्यान, पौड पोलीस स्टेशनमध्ये खेडकर कुटुंबातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांचे एक पथक बाणेर रस्त्यावरील खेडकर यांच्या बंगल्याची पाहणी करून गेले. मात्र पोलिसांना खेडकर कुटुंबाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना चौकशीशिवाय तेथून परतावे लागले. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांची पुढची कारवाई काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.