Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. १ ऑगस्ट) विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पुण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी हे पुणेकरांना वेगवेगळ्या प्रकल्पांची भेट देणार आहेत. असे असताना विरोधक मोदींच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. मात्र, मोदी द्वेषाची काविळ झालेल्या विरोधकांनी पुणेकरांच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्यास जशाच तसे उत्तर देऊ. ते ज्या ठिकाणी आंदोलन करतील, त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेही आंदोलन करतील, असा इशारा पुण्याचे माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिला. (If you protest against Modi, you will answer as you like: Murlidhar Mohol)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. त्यांना उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवेसना उद्धव ठाकरे गट आदींनी मोदींच्या विरेाधात आंदेालन करण्याचा इशारा दिला आहे. त्याला मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले की, पुण्यात एक ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पण, विरोधकांनी म्हणजे काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांनी मोदी यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही भाजप म्हणून त्यांना एवढंच सांगतो की विरोधकांना आंदोलनानेच आम्ही उत्तर देऊ. ते ज्या ठिकाणी आंदोलन करतील, त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत.
पुण्याला वेगवेगळ्या प्रकल्पांची भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहे. या प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला गती येणार आहे. या विरोधकांचा विरोध नेमका कशाला आहे?, हेच कळत नाही. दुटप्पी आणि नौटंकी भूमिका कशासाठी? शरद पवार पुरस्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर जाणार आणि त्यांच्याच पक्षाचे लोक या पुरस्काराला विरोध म्हणून आंदोलन करणार? असा सवालही त्यांनी केला.
मोहोळ म्हणाले की, काँग्रेसने विरोध करताना एवढंही भान ठेवले नाही की, ज्या घराला, कुटुंबाला काँग्रेस विचाराची परंपरा आहे. त्यांनी मोदींना पुरस्कार देण्यासाठी बोलावले आहे. जयंतराव टिळकापासून रोहित टिळकांपर्यंत हे कुटुंब काँग्रेस विचाराचं राहिलेलं आहे. त्या पक्षाचे लोक मोदींना विरोध करत आहेत. त्यामुळे हे दुटप्पी आणि नौटंकी आंदोलन आहे.
मोदी द्वेषाने पछाडलेली ही सर्व माणसं आहेत. ह्यांना फक्त मोदी द्वेष आहे. त्यांना बाकी काही देणंघेणं नाही. आम्हीही आता आक्रमक भूमिका घेणार आहोत. ते लोक ज्या ठिकाणी आंदोलन करतील, त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत, असे माजी महापौरांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.