Jejuri Villagers will Meet Raj Thackeray : जेजुरी देवसंस्थान विश्वस्त मंडळाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्याचे दिसून येत आहे. सात विश्वस्तांपैकी पाच जण जेजुरीबाहेरील असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे.
सध्या या विश्वस्त मंडळाविरोधात ग्रामस्थांनी चक्री आंदोलन सुरू केले आहे. आज बुधवारी (ता. ३१ मे) या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यास वाढता प्रतिसाद पाहता हा विश्वस्त निवडीचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंदोलकांना विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री विजय शिवतारे आणि आमदार संजय जगताप यांनी भेट दिली आहे. आता आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत.
जेजुरीबाहेरील निवडलेल्या विश्वस्तांवरून ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला. पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (Agitation) केले. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडलेल्या विश्वस्तमंडळास सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आता उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा बुधवारी (ता. ३१ मे) सहावा दिवस आहे. त्यास ग्रामस्थ, विविध संघटना, गणेश मंडळे आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आता हे चक्री उपोषणासाठी पुढील महिनाभराच्या तारख्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
सहधर्मदाय आयुक्तांनी नेमलेल्या जेजुरी विश्वस्त मंडळास असहकार करण्याचा निर्णय नागिरकांच्या वतीने घेतला आहे. याचा परिणाम भाविकांवर होणार नसल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे. मात्र जेजुरी येथे मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीची व दाखल होणाऱ्या वारकरी भाविकांची सेवा न करण्याचा गर्भीत इशारा ग्रामस्थांनी सरकारला दिलेला आहे. त्याचा परिणाम जेजुरीत मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वस्त नेमणुकीबाबत आता जेजुरीतील आंदोलक राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी त्यांना ४ जून तारीख दिली आहे.
याबाबत माजी विश्वस्त, खांदेकरी मानकरी मंडळाचे संयोजक संदीप जगताप म्हणाले, "विश्वस्त पदांची निवडीतून जेजुरीकरांवर अन्याय झाला आहे. या निवडीला नाकारूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाकडे राज ठाकरे यांनी लक्ष घालावे, यासाठी त्यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यांच्या भेटीसाठी ग्रामस्थांचे पंधरा जाणांचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी ४ जून रोजी सकाळी ११ वाजता वेळ दिली आहे."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.