Hemant Rasane vs Ravindra Dhandekar : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. या दोन्ही निवडणुक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.
काल (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक टिळक कुटुंबियांची भेट घेतली होती. भाजपकडून आज कसबा मतदारसंघातून माजी नगरसेवक हेमंत रासने (Hemant Rasane) यांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून हेमंत रासने यांची ओळख आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ते अध्यक्ष होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात आहे.
रासने यांच्यासमोर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. धंगेकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून लवकरच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले रविंद्र धंगेकर यांनी जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची काल (शुक्रवारी) बैठक झाली. त्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. आज (शनिवारी) उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्यांच तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
रासनेसमोर धंगेकरांचे कडवे आव्हान
शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर क़डवे आव्हान उभे केले होते.
धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. यानंतर झालेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते. मनसे मध्ये अनेक पदावर त्यांनी कामे केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले..
रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "टिळक कुटुंबीयांशी चर्चा करुन कसबा पेठेतील उमेदवार दिले आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली," भाजपने कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.