मावळ (जि.पुणे) लोकसभा मतदारसंघात ( Maval Lok Sabha Constituency ) गुरूवारपासून (ता.18) अर्ज भरण्यास सुरवात झाली. मात्र,पहिला अर्ज अपक्ष उमेदवाराने शुक्रवारी (ता.19) दाखल केला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी 12 जणांनी 21 अर्ज नेले. मावळमध्ये आघाडीकडून (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील ( Sanjog Waghere Patil ) आणि युतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे ( Shrirang Barne ), असे दोन्ही मुख्य उमेदवार घाटावरचे आणि पिंपरी-चिंचवडमधीलच आहेत. बारणे हे 22, तर वाघेरे 23 एप्रिलला अर्ज भरणार आहेत. आज दाखल झालेला पहिला अर्जही घाटावरचाच आहे. कर्जत येथील यशवंत विठ्ठल पवार (कर्जत, क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे अर्ज दाखल केला.
`मावळ`मध्ये वंचित उमेदवार देणार की पाठिंबा?
गुरूवारी पहिल्याच दिवशी मावळमध्ये 27 व्यक्तींनी 49 उमेदवारी अर्ज नेले होते. तर, शुक्रवारी 12 जणांनी ते 21 नेले. त्यामुळे दोन दिवसांत 39 व्यक्तींनी 70 अर्ज नेले आहेत. आज डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणून अर्ज नेला. त्यामुळे वंचित मावळात उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यात वंचितने बारामतीत महाविकास आघाडीच्या (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला असून पुण्यात वसंत मोरेंना तिकीट दिले आहे. तर, शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांना दिलेली उमेदवारी त्यांनी नंतर रद्द केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मावळमध्ये वंचित घाटाखालील उमेदवार देतील, अशी चर्चा आहे. मात्र, अर्ज आज घाटावरील दोघांनी त्यांच्यावतीने नेल्याने कुतूहल वाढले आहे. फुलचंद मंगल किटके (पनवेल) यांनी बहुजन समाज पार्टी म्हणून अर्ज नेला. या पक्षाला पाठिंबा वंचित देणार अशीही कुजबूज आहे. दरम्यान, वंचितने आपला उमेदवार उभा केला, तर मावळची लढत ही थेट न होता तिरंगी होण्याची शक्यता आहे.
वाघेरे विरुद्ध वाघेरे उभे राहणार का?
गुरूवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवक दत्तात्रेय वाघेरे यांनी अर्ज नेला. ते काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. नंतर शिवसेनेकडून उभे राहिले असता पराभूत झाले. सध्या ते ठाकरे शिवसेनेत आहेत. त्यामुळे ते संजोग वाघेरे-पाटील ( Sanjog Waghere Patil ) यांच्याविरुद्ध उभे राहून बंड करणार का? अशी चर्चा ऐकायला मिळाली.
"निवडणूक लढवायची की नाही, ते बघू," असं संदिग्ध उत्तर दत्तात्रेय वाघेरेंनी दिलं. त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे. ते निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, उमेदवारीची जाहीरपणे मागणी वाघेरेंनी केली नव्हती. संजोग वाघेरे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतले नसल्याने नाराज होऊन दत्तात्रय वाघरेंनी अर्ज नेल्याचे समजते.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.