Pimpri News : आगामी लोकसभेला मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार) मिळावी म्हणून या पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी दावा ठोकला. तो त्यांनी शनिवारी (ता.३) कायम ठेवल्याने बारणेंचे टेन्शन वाढलेलेच आहे. यामुळे ही जागा महायुतीत शिवसेना की राष्ट्रवादी नक्की कोण लढणार हा तर्कवितर्क कायम राहिलाच नसून उलट तो वाढला आहे.
गेल्या महिन्यात सूप वाजलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मावळसाठी किती निधी आणला याची माहिती देण्यासाठी आमदार शेळके यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी मावळसाठी दोन हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यातील बाराशे कोटींची सुरु झाल्याची माहिती दिली.
मी खरंच कामे केली की नुसती आश्वासने दिली हे तपासण्यासाठी गेल्या चार वर्षातील आपल्या कामाचा अहवाल पुढील महिन्यात आपण घरोघरी देणार असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळच्या संभाव्य आरोपांतील हवा आठ महिने अगोदरच काढून घेतली.
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटलीच पाहिजे, याचा पुनरुच्चार शेळकेंनी याप्रसंगी केला. ती का मिळावी याचा लेखाजोगा त्यांनी आपल्या पक्षासह भाजप आणि शिंदे शिवसेना यांनाही दिल्याचे सांगितले. ही जागा मिळाली, तर तेथून राष्ट्रवादीचा उमेदवार दीड लाखाच्या लीडने निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. त्याचवेळी युतीचा जो कोणी उमेदवार येथे असेल, मग ते बारणे असोत, त्याचे पक्षाच्या आदेशानुसार काम करू,असेही ते म्हणाले. खा.बारणेंशी आपले वैर नसून फक्त तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यासाठी त्यांनी आपल्या कामाचा अहवाल द्यावा, एवढेच आपले म्हणणे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत असले, तरी मावळात ते एकत्र दिसत नाहीत, त्यातही भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत, असे विचारले असता शेळकेंनी नाव न घेता त्यांच्या नुकत्याच तळेगावात झालेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविलेले भाजपचे माजी राज्यमंत्री तथा मावळचे माजी आमदार बाळा भेगडेंना टोला लगावला. त्यांच्याकडे राज्य स्तरावरील मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने ते मावळातील कार्यक्रमाला हजेरी लावत नसावेत,असे ते म्हणाले. मात्र,आता त्यांच्या सोईने मी पुढील कार्यक्रम घेईल,असे ते उपरोधाने म्हणाले. जनरल मोटर्सची लढाई हरल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी कामगार मंत्र्य़ाचे सहकार्य मिळाले नसल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला.
(Edited by : Sachin Waghmare)