

मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यात एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईदरम्यान तब्बल 18 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून मोठी रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदौर जिल्ह्यातील अवलीपूरा गावात असलेल्या एका फार्महाऊसवर मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे फार्महाऊस शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकला.
छापेमारीदरम्यान फार्महाऊसमध्ये जुगाराचा डाव रंगलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 18 जणांना ताब्यात घेतले. मात्र कारवाई सुरू होताच 6 जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता 30 मोबाईल फोन, पत्ते आणि सुमारे 13.68 लाख रुपयांची रोकड जप्त केली. जुगार खेळण्यासाठी फार्महाऊसचा मुख्य दरवाजा बंद करून आतमध्ये ही बेकायदेशीर हालचाल सुरू होती, अशी माहितीही तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार जगदीश राठोड उर्फ कुबडा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो फार्महाऊसचा केअरटेकर रणजित चौधरी आणि इतर काही जणांसह घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे फार्महाऊस आयएएस अधिकारी वंदना वैद्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. वंदना वैद्य सध्या राज्य सरकारच्या वित्त विकास निगममध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
या घटनेनंतर वंदना वैद्य यांनी पोलिसांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की काही अज्ञात लोकांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिथे गुन्हेगारी कृत्ये केली असावीत. तसेच या लोकांनी चोरीही केली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत मनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी, बीट प्रभारी उपनिरीक्षक आणि एका सहायक उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.