Pollution Free Diwali: उच्च न्यायालयाचा आदेश! शिक्षण विभाग अॅक्शन मोडमध्ये; दिवाळीआधी शाळांना महत्त्वाचा आदेश

Maharashtra Schools Pollution-Free Diwali Oath: प्रदूषणमुक्त दिवाळी: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवण्याची आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.
Maharashtra Schools Pollution-Free Diwali Oath
Maharashtra Schools Pollution-Free Diwali OathAI
Published on: 
Updated on: 

Pune News: यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आणि आनंददायी करण्यासाठी शालेय स्तरावरून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दीपावली’ची शपथ देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यासंदर्भातील राजपत्रित आदेश आणि परिपत्रक सर्व शिक्षण अधिकारी व प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी

मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुओ मोटो (Suo Motu) जनहित याचिका क्रमांक १/२०२६ च्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी काही कडक निर्देश दिले होते. वाढत्या पर्यावरणीय आणि ध्वनी प्रदूषणामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी शालेय स्तरावरून जनजागृती होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिफारशी आणि शासन पत्रानुसार शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. दीपावलीच्या आनंदोत्सवात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

परिपाठाच्या वेळेत होणार विशेष शपथविधी

राज्यातील सर्व विभागांमधील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांचे प्रशासन अधिकारी तसेच सर्व जिल्ह्यांतील शाळांचे मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक यांना या उपक्रमाबाबतच्या सविस्तर सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

शाळांमध्ये रोज भरणाऱ्या सकाळच्या किंवा दुपारच्या परिपाठाच्या वेळेचा सदुपयोग करून हा शपथविधी पार पाडण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे एकाच वेळी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेता येणार आहे.

Maharashtra Schools Pollution-Free Diwali Oath
Shalarth Portal News: 'शालार्थ'मध्ये घोळ! 3,625 शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी; शिक्षण विभागाचा दणका, वेतन अडकले,15 नोव्हेंबरची डेडलाइन

काय आहे शपथेचा नेमका मजकूर?

विद्यार्थ्यांनी स्वतःहून फटाक्यांपासून दूर राहावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे, यासाठी एक विशेष शपथ तयार करण्यात आली आहे:

"दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही, यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे."

Maharashtra Schools Pollution-Free Diwali Oath
Punjab AAP Crisis News: पंजाबमध्ये AAP ला दोन दिवसांत तीन धक्के! तीन आमदारांनी सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश

प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर शाळांमध्ये या उपक्रमामुळे एक सकारात्मक संदेश जाणार असून, विद्यार्थी भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अधिक जागरूक होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.