Maharashtra Scholarship Exam 2027: चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! परीक्षा कधी? अर्जाची अंतिम मुदत काय?

Maharashtra 4th & 7th Std Scholarship Exam 2027 Schedule: महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ साठी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षा २१ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार असून, अर्जाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ आहे.
Maharashtra 4th & 7th Std Scholarship Exam 2027 Schedule
Maharashtra 4th & 7th Std Scholarship Exam 2027 ScheduleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आगामी २१ फेब्रुवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शाळांमार्फत हे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक आणि अर्ज करण्याचे टप्पे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) या दोन्ही परीक्षा २१ फेब्रुवारी २०२७ रोजी पार पडणार आहेत. परीक्षेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत प्रथम भाषा आणि गणित विषयांचे पेपर असतील, तर दुसऱ्या सत्रात दुपारी ०२:०० ते ०३:३० या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेतली जाईल.

Maharashtra 4th & 7th Std Scholarship Exam 2027 Schedule
Maharashtra Retired Employees: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीला ब्रेक! वित्त विभागाचा मोठा आदेश

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने शुल्क रचना ठरवण्यात आली आहे

नियमित शुल्क: २७ ऑक्टोबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६

विलंब शुल्क: १ डिसेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६

अतिविलंब शुल्क: १६ डिसेंबर २०२६ ते २३ डिसेंबर २०२६

अति विशेष विलंब शुल्क: २४ डिसेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६

दिनांक ३१ डिसेंबर २०२६ च्या नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद शाळा आणि पालकांनी घ्यावी.

पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षेचे स्वरूप

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारा आणि शासनमान्य शासकीय, अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत शिकणारा विद्यार्थी पात्र ठरतो. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगु आणि कन्नड यासह सेमी इंग्रजी पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १ जून २०२६ रोजी १० वर्षांपेक्षा (दिव्यांग १४ वर्षे) आणि सातवीसाठी १३ वर्षांपेक्षा (दिव्यांग १७ वर्षे) जास्त नसावे.

परीक्षेतील सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी (MCQs) स्वरूपाचे असतात. यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांसाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ७५० रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

Maharashtra 4th & 7th Std Scholarship Exam 2027 Schedule
DA Hike 2026: महागाई भत्ता वाढला; किती पगार वाढणार? महाराष्ट्रात DA थकबाकीसाठी 800 कोटी मंजूर

मुख्याध्यापक व पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया केवळ परिषदेच्या www.mscepune.in व [https://puppssmsce.in](https://puppssmsce.in) या अधिकृत संकेतस्थळावरूनच पूर्ण करायची आहे. अर्जातील विद्यार्थ्यांची जन्मतारीख व इतर माहिती जनरल रजिस्टर प्रमाणे अचूक भरण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील. सीबीएससी (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) शाळांमधील विद्यार्थी देखील या परीक्षेस बसू शकतात, त्यांना राज्य व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत स्थान व प्रमाणपत्र मिळते, मात्र त्यांना थेट शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. अधिक माहितीसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा किंवा परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com