Mahesh Landage : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांची ही दुसरी टर्म आहे. पहिल्यांदा २०१४ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना ती मिळाली नव्हती, असा गौप्यस्फोट प्रथमच लांडगे यांनी रविवारी (ता.२९) भोसरीत एका कार्यक्रमात बोलताना केला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला.
"२०१४ ला महेश माझ्याकडे आला. त्याने माझ्याकडे उमेदवारी मागितली होती. हा पैलवान दाढीवाला नक्की निवडून येईल, असे मलाही वाटले होते. पण, त्यांना मात्र पारख नव्हती. मग,मी तरी काय करणार, या शब्दांत शिंदे यांनी महेश लांडगेंना तिकिट न मिळण्याचे खापर उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर फोडले.
आमदार लांडगेंनी भरविलेल्या देशातील सर्वात मोठ्या इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोपाप्रसंगी शिंदे आणि लांडगे या दोघांनीही हा गौप्यस्फोट प्रथमच एका व्यासपीठावर केला.२०१९ लाच शिवसेना, भाजप युती व्हायला पाहिजे होती, अशी खंत व्यक्त केली. त्याचवेळी आता ती सहा महिन्यांपूर्वी झाल्याबद्दल शिंदे यांनी आनंदही यावेळी व्यक्त केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट तसेच दादा इधाते आदी यावेळी व्यासपीठावर होते.
भंडारा डोंगरावरील (ता.मावळ) सोहळा लांबल्याने भोसरीत येण्यास मुख्यमंत्र्यांना नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशीर झाला. त्यामुळे त्यांनी बारा मिनिटात आपले भाषण संपवले. त्यात त्यांनी या जत्रेत उभे केलेली अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृती पाहून महेशदादांचा काही भरवसा नाही, ते काहीही करू शकतात, अशी पावती दिली. तर, भारतमाता की जय अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भाषणाची सुरवात आमदार लांडगेंनी केली.
२०१४ ला एकनाथ शिंदेंना भेटलो व तुमच्याकडून उमेदवारी हवी आहे, कारण दाढीवाला कमी पडत नसतो, असे त्यांना म्हणालो होतो, त्यांच्याही मनात होतं,अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. भारतात दाढीवाले काय करू शकतात हे सांगताना ते पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईकही करतात, असे ते म्हणताच उपस्थितांनी त्याला मोठी दाद दिली. आघाडी सरकारवर टीका करताना गेले अडीच वर्षे वनवासात होतो, रात्रीची झोप लागत नव्हती. पण, आता सहा महिन्यांपासून फरक पडला असून, प्रशासन ओळख द्यायला लागले आहे,असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.