Sugar Factory News : सोमेश्वर साखर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे माळेगावच्या कार्यक्षेत्राला जोडण्याचा महत्वपुर्ण विषय मंगळवारी अधिकृतरित्या अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांच्या संचालक मंडळाने रद्द केला. तसेच ड्राफ प्रोसडिंगमध्येही सदरचा विषय नामंजूर झाल्याची दुरूस्ती केली जाणार असल्याचे जाहीर केले. विशेषता नव्याने अध्यक्ष पदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर जगताप यांनी हा महत्त्वपूर्ण घेतलेल्या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले.
"ऊस टंचाईच्या प्रतिकूल स्थितीत आगामी गळीत हंगामात ऊस मिळविण्यासाठी वरील धोरणात्मक निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. अधिकचा ऊस दर देण्याची परंपरा असल्याने गेटकेनधारकांचा माळेगाववर विश्वास आहे. त्या मुळे यंदा माळेगावचे १० लाख टनापेक्षा अधिकचे ऊस गाळपाचे उद्दिष्ठ पुर्णत्वाला जाईल. त्यासाठी माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ शर्थीचे प्रयत्न करेल", अशा विश्वास अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी यावेळी व्यक्त केला.
माळेगाव कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने सभासदांना मागिल सभेचे ड्राफ प्रोसडिंग पाठविले होते. त्या प्रोसडिंगमध्ये सोमेश्वरच्या हद्दीमधील १० गावे माळेगावला जोडण्याचा विषय बहुमताने मंजूर झाल्याचा उल्लेख केला होता. प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी अक्षेप घेतला. तसेच त्यांनी गतवर्षीचा अंतिम दर, विस्तारिकरण होत असलेला डिस्टलरी प्रकल्पावर सत्ताधारी संचालक मंडळावर टिकेची झोड उडवली होती.
त्या पार्श्वभूमिवर अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे आदी संचालकांनी विरोधकांच्या आरोपांना मंगळवारी सडेतोड उत्तरे दिली. अध्यक्ष जगताप म्हणाले, ''कमी खर्चात अधिक गाळप केल्यास सभासदांना राज्यात सर्वाधिक ३ हजार ४११ रुपये ऊस दर देता येतो. हे चित्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली माळेगावने दाखवून दिले आहे. माळेगावचे उसाचे कार्यक्षेत्र मुळातच मर्यादित आहे. त्यात कारखान्याचे विस्तारिकण झाले आहे. गळीचे उद्दिष्ठ पुर्ण करण्यासाठी जवळचे उसाचे कार्यक्षेत्र वाढले पाहिजे, त्यातून सोमेश्वरची १० गावे घेण्याचा विषय पुढे आला होता.
मात्र, सभासदांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने हा विषय अधिकृतरित्या रद्द केला. तसे ड्राफ प्रोसडिंग दुरूस्त केले जाईल.'' विरोधकांच्या कारकिर्दीमध्ये सन २०१६-१७ ला सरासरी साखर विक्री ३ हजार ४२१ रुपये झाली होती. त्या वेळी सभासदांना निच्चांकी असा २९०० रुपये प्रतिटन दर मिळाल्याची नोंद आहे. याकडे लक्ष वेधत संचालक अनिल तावरे यांनी माळेगावने गतवर्षीच्या उसाला सर्वाधिक ३ हजार ४११ रुपये दर दिल्याचे निदर्शास आणले. कारखान्याची गळीत क्षमता व भविष्यात बगॅससारख्या कच्च्या मालाची उपलब्धता विचारा घेवून इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारिकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांची पाच लाख लिटर क्षमतेची मागणी संयुक्तिक नाही, अशी माहिती संचालक योगेश जगताप, नितीन सातव यांनी व्यक्त केली.
अजितदादा सहाकारचेही पुरस्कर्ते...
माळेगाव, सोमेश्वर हे सहकारातील कारखाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. गतवर्षीच्या ऊसाला माळेगावने ३ हजार ४११, तर सोमेश्वरने ३ हजार ३५० इतका राज्यात प्रथम क्रमांचा उस दर दिला. अजितदादा हे सहकाराचे पुरस्कर्ते आहेत, हेच या मधून सिद्ध होते. त्या मुळे अजितदादांची धोरणे सहकाराच्या विरोधात आहेत, या विरोधकांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे सभासद जाणून आहे, अशी भूमिका मांडत संचालक योगेश जगताप, सचिन सातव, अनिल तावरे आदींनी घेत विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.