
Pune News : कृषिमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या काही विधानांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. आता एकीकडे कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या आमदारकी व मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच सरकारमधील किंवा बैठकीपूर्वीच बैठकीतला अजेंडा छापला जातो,यावरुन आपल्याच मंत्र्यांना चांगलंच झापलं होतं. त्यातच आता कृषिमंत्री कोकाटेंनी सरकारमधली ती गोष्ट जगजाहीर करुन टाकली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यस्तरीय पणन परिषदेतून उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारमधील कामकाजावर मोठं भाष्य करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हांला पहिल्याच दिवशी दम भरला असल्याचं सांगितलं. आम्ही मोठ्या संख्येने निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही,माझ्यासह...त्यामुळे जास्त मस्ती कराल, तर घरी जाल,असा इशाराच फडणवीसांनी आम्हांला दिला असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.
तसेच मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए,ओएसडीसुद्धा ठरवतात.त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेलं नाही.त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल.पण आपणालाही नीट काम करावं लागेल.या ठिकाणी आपल्या सगळ्यांची चांगली सांगड बसली तर निश्चितपणे समाजात एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल,शाश्वती निर्माण होईल.त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल, अशी भूमिकाही कोकाटेंनी यावेळी मांडली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत तसेच खोटी माहिती देत आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्यानंतर ते आमदारपदी राहण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे कोकाटे हे सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीदरम्यान आपल्याच मंत्र्यांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आलं होतं.कॅबिनेट बैठक होण्यापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा हा छापला जातो.त्यामुळे फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना अशाप्रकारे पुन्हा वागू नये,असा सज्जड दम भरला होता.
फडणवीस म्हणाले,सरकारच्या कॅबिनेटमधील अजेंडा अशाप्रकारे बाहेर पडणं म्हणजे गुप्त माहिती बाहेर देण्यासारखं आहे.आपण मंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतो. त्यामुळे मंत्र्यांनी असं कृत्य केलं तर गोपनीयतेचा भंग होतो.असं कृत्य केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल,अशी तंबीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना दिली.आता कोकाटेंनी थेट महायुती सरकारमधील कारभाराविषयी जाहीरपणे भाष्य केलं आहे.त्यामुळे पुन्हा एकदा त्याचे पडसाद सरकारमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.