Pimpri : मराठा आरक्षणासाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप आता अधिक तीव्र झाला आहे. कालपासून (ता. २९) तर गावागावांत उपोषण सुरू झाले आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आपल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला शनिवारी (ता. २८) जाता आले नाही. त्याची पिंपरी-चिंचवडच्या वेशीवर असलेल्या कासारसाई (ता. मुळशी) संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात येत्या शुक्रवारी (तीन नोव्हेंबर) पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम कारखान्याच्या संचालकांनी कारखान्याचा २६ वा गळीत हंगाम सुरू करण्यासह कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचेही उद्घाटन अजित पवारांचे हस्ते होणार असल्याची जोरदार प्रसिद्धी हा कारखाना मोडत असलेल्या मावळ आणि मुळशी या दोन्ही तालक्यात केली आहे.
या कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी स्वतः त्यासाठी काल आंदर मावळचा दौरा केला. मात्र, मराठा आरक्षणासाठीचे या समाजाचे तीव्र झालेले आंदोलन पाहून माळेगावला जाणे अजित पवारांनी टाळले. त्यामुळे ते संत तुकारामच्या गळीत हंगामालासुद्धा येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्याला कारखान्याच्या एका संचालकाने 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. मंत्रिमंडळ उपसमितीच्या आजच्या बैठकीत मराठा आंदोलन मागे घेतले जाईल, असा काही ठोस निर्णय झाला नाही, तर काही खरं नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संत तुकारामचे एमडी साहेबराब पाठारे यांनीही आपल्या संचालकांसारखीच प्रतिक्रिया दिली. आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत याप्रश्नी तोडगा निघेल, त्यामुळे अजितदादा गळीत हंगामाला येतील, असा आशावाद त्यांनीही व्यक्त केला. तसेच त्यांनी येऊ, असा शब्दही दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मराठा आंदोलकांनी गळीत हंगामाला विरोध केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एकूणच ही नाजूक परिस्थिती आणि त्यात अजितदादांना झालेला डेंगींचा आजार पाहता ते येण्याची शक्यता कमीच दिसते आहे. शरद पवार विघ्नहरच्या गळीत हंगामाला जाणार की नाही हेही आजच्या मुंबईतील या बैठकीवर ठरणार आहे.
संत तुकारामच्या एक दिवस अगोदर म्हणजे २ नोव्हेंबरला जुन्नर तालुक्यातील ओझऱ येथील विघ्नहर कारखान्यातसुद्धा मोळी टाकली (गळीत हंगामाची सुरवात) जाणार आहे. त्यासाठी या कारखान्याचे अध्यक्ष कॉंग्रेसचे सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलावले आहे. पण, बिघडलेली राज्यातील एकंदर परिस्थिती पाहून ते या कार्यक्रमाला येतील की कसे, याविषय़ी साशंकता वर्तविण्यात आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाला, तर चांगलंच. नाही, तर मग काय करायचं ते उद्या, परवा ठरवू,असे शेरकर म्हणाले. मराठा आंदोलकांसोबतच असल्याने कारखान्याच्या गळीत हंगामाला त्य़ांचा विरोध नाही, हेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.