राम गावडेंना हटवून माऊली कटके शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर)

राम गावडेंना हटवून माऊली कटके शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर)
Published on
Updated on

पुणे : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांविरोधात शिवसेनेने कारवाई सुरू केली असून त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जुन्नरमधील पक्षाच्या नेत्या आशा बुचके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कटके यांनी आढळराव यांना त्यांच्या वाघोली गटातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. तरुण चेहरा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गावडे हे गेली अनेक वर्षे जिल्हाप्रमुख होते. त्यांच्याच खेड मतदारसंघात आढळरावांना पिछाडीवर राहावे लागले होते.

पक्षाने शिरूर लोकसभा मतदारसंघात तालुकाप्रमुख नेमले आहेत. त्यांचीही घोषणा करण्यात आली. त्यात माऊली खंडागळे (जुन्नर), अरुण गिरे (आंबेगाव), रामदास धनवटे (खेड-आळंदी), गणेश जामदार (शिरूर, 39 गावे)

या सर्व निर्णय़ांमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. तो पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. आढळराव यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर कारवाई सुरू झाली आहे. पुणे शहरातील दोन प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांनाही दोन दिवसांपूर्वी पदावरून दूर करण्यात आले होेते.

बुचके या 2002 पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. 2014 च्या निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या प्रवेशाला बुचके यांनी विरोध केला होता.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी बुचके समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून त्यांना सुनावण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुचके यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून त्यांना अखेर पक्षाबाहेर काढण्यात आले. या गटबाजीचा जुन्नरमधून पक्षाला सर्वाधिक फटका बसला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना 46 हजाराचे मताधिक्य मिळाले.  बुचके यांच्या हकालपट्टीने शरद सोनवणे यांनी जुन्नरची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com