

तळेगाव दाभाडे : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला आहे. बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. भाजपचे सुभाष रघुनाथ जाधव यांनी ११ विरुद्ध ७ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलावडे यांचा पराभव करून सभापतीपद पटकावले.
मावळ तालुका खरेदी-विक्री संघानंतर बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला बसलेला हा धक्का राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.या अनपेक्षित विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेव शेलार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी सहकार उपनिबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून विक्रम कलावडे तर भाजपकडून सुभाष जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत जाधव यांना ११ मते मिळाली, तर कलावडे यांना ७ मतांवर समाधान मानावे लागले.
उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे विलास बबन मानकर आणि भाजपचे साईनाथ मांडेकर यांच्यात लढत अपेक्षित होती. मात्र, मांडेकर यांनी माघार घेतल्याने मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी अधिकृत घोषणा केली.
मावळ बाजार समितीत एकूण १८ संचालक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, भाजपचे ५ आणि काँग्रेसचा १ संचालक आहे. स्पष्ट बहुमत असूनही राष्ट्रवादीच्या चार ते पाच मतांची फूट पडल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे पक्षांतर्गत नाराजी उघड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्वी सर्व संचालकांना कालावधीप्रमाणे सभापती-उपसभापती पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र, नंतर राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली. याचाच फायदा घेत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला अपयश आले होते. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापतीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.नवनिर्वाचित सभापती सुभाष जाधव यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.