Pune News : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी होणार की मावळचे मतदार उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या बाजुने कौल देणार याचा निकाल पुढील आठवड्यात लागणार आहे. येत्या ४ जूनला मतमोजणी होणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पराभवाचा धक्का देणार की बारणे आपली खासदारकी पुन्हा ठेवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही वर्षापासून मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर विद्यमान खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा शिंदे यांच्या वाट्याला आल्यानंतर खासदार बारणे यांनाच उमेदवारी देण्यात आली. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना महायुतीकडून संधी दिली. या मतदारसंघात 54.87 टक्के मतदान झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदान कमी झाल्याने या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मतदारसंघातून 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी मुख्य लढत ही महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्येच होणार आहे. या मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे मतमोजणी होणार आहे. चिंचवड, पनवेल या विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 24 टेबल असणार आहेत. या मतदारसंघात मतमोजणीसाठी 23 फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल लावण्यात येणार असून 24 फेऱ्या होणार आहे. तर पिंपरी, मावळ (Maval) विधानसभा मतदार संघासाठी 16 टेबल असून 25 फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र 5 टेबल याप्रमाणे एकूण 113 टेबलवर ही मतमोजणी होईल
या मतमोजणीसाठी तब्बल 1 हजार 530 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 9 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 58 इतर अधिकारी, 205 सूक्ष्म निरीक्षक, 118 मतमोजणी पर्यवेक्षक, 175 मतमोजणी सहाय्यक, 96 कर्मचारी यांच्याशिवाय 863 शिपाई, इतक्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या ठिकाणी हजर राहणाऱ्या निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, टॅब, इलेक्ट्रॉनिक घड्याळ तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.