पुणे : गुन्हेगारीच्या संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बेजबाबदार आणि चुकीची वक्तव्ये करीत आहेत. हा प्रकार त्यांनी त्वरीत थांबवावा,अन्यथा यापुढे आम्हीही तुमची प्रकरणे बाहेर काढू,त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना आज दिला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा व राष्ट्रवादीत राजकारणातील गुन्हेगारीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पाश्र्वभूमीवर जगताप यांनी महापौर मोहोळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर थेट संघटित गुन्हेगारीचा आरोप केला. भाजपाच्या एका नगरसेवकावर वानवडी येथे गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी महापौरांनी गुन्हेगाराला फोन करायला लावल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
जगताप यांच्या या आरोपानंतर महापौर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ शहराध्यक्ष जगताप बेजबाबदारपणे वैयक्तिक टीका करीत आहेत. रोज आमच्या पक्षाच्या नेत्यांवर काहीतरी बोलायची सवय लागली आहे. त्यांनी स्वतःला सावरायला हवे. कोणत्याही प्रकरणात नाव घेताना त्याची सत्यता असावी, पुरावे असले पाहिजे. यापुढे त्यांचे चुकीचे बोलणे खपवून घेतले जाणार नाही. असेच वैयक्तिक आरोप करणार असाल तर याची किंमत मोजावी लागेल.’’
सभागृहनेते गणेश बीडकर यांनी गुरुवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ‘भाजपचा गुन्हेगारीचा दुसरा अंक’ असे सांगत आज प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भाजपावर गंभीर आरोप केल्याने हा वाद वैयक्तिक पातळीवर आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महापौर मोहोळ यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखण्याचे व जबाबदारीने बोलण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.