Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागू झाली असतानाच पुण्याजवळील खेडशिवापूर टोल नाका येथील निवडणूक आयोगाच्या पथकाच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रुपये मिळाल्याचं समोर आला आहे.
ही गाडी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याची असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर सोशल मीडिया पोस्ट करीत आणखी चार गाड्या कुठे गेल्या असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवापूर टोलनाका येथील चेक पोस्टमध्ये अशा प्रकारचे पैसे आढळून आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांना लक्ष केल आहे.
संजय राऊत म्हणाले, "मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाका येथे 15 कोटी सापडले आहेत! हे आमदार कोण? 'काय झाडी..., काय डोंगर...' संजय राऊत पुढे म्हणाले, मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटी चा हा पहिला हप्ता ! काय बापू, किती हे खोके?" सवाल करत गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केला आहे. रोहित पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.