Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चांगलं यश मिळवलं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक नेते हे पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अमोल कोल्हे यांनी बुधवारी पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतलं. यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. अमोल कोल्हे म्हणाले, "आज पुण्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला मागणं केलं की जे महाराष्ट्रातील गुलामीचं, भ्रष्टाचाराचा आणि महिलांच्या असुरक्षिततेचे जे संकट आहे ते दूर होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आणि तरुणांचं स्वाभिमानी सरकारी येऊ दे,"
सध्याच्या महायुती सरकारमध्ये एक वाक्यता दिसत नाही त्यांनी जाहीर केलेला योजनांची वेगवेगळी नाव समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील देखाव्यामध्ये एका उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही, ही गोष्ट आपण पाहिली यावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भ्रष्टाचारी सरकारला जनता वैतागली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत देखील महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झाले आहे.
बारामती मधील मेडिकल कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "यापूर्वी देखील महायुतीच्या नेत्यांनी बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जो कार्यक्रम घेतला होता त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोंबडं कितीही झाकलं तरी महाविकास आघाडीचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये येण्यासाठी खूप जण इच्छुक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत अमोल कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सर्वांना कळून चुकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही फोडाफोडीच्या राजकारणाला आणि खोक्याच्या राजकारणाला अजिबात थारा देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये येणाऱ्यांची रांग लागली आहे, हे स्वाभाविक आहे.
पाच वर्षांपूर्वी भाजपसोबत जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी भाजपकडून मेगा भरती झाल्याचे बोललं जाते. त्यावर "भाजपची ती मेगा भरती होती की सूज होती हे आगामी काळात कळालं आहे. पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही. हे आपण पूर्वीपासून पाहिला आहे," असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिरूरमध्ये नेमका कोणता पॅटर्न राबवणार असं विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले शिरूरमध्ये फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हाच पॅटर्न शिरूर मध्ये चालणार असं अमोल कोल्हे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.