राजकारणाच्या मैदानात भाजपच्या सुजय विखे यांना चितपट करणारे, राजकीय डावपेचात सरस असलेले खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) कबड्डीच्या डावात मात्र 'बाद'झाले आहेत. राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक (Maharashtra Kabaddi Association Election) २१ जुलैला होत आहे. यासाठी करण्यात आलेल्या मतदार यादीतून नीलेश लंके यांचे नाव अवैध ठरवले आहे.
लंकेंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात राज्यातील काही खेळाडू दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य संघटनेचे सध्याचे अध्यक्ष अजित पवार यांनीच सर्व साधारण सभेत ही निवडणूक क्रीडा संहितेनुसार घेण्याचे संकेत दिले होते. न्यायालयानेही संघटनांमध्ये क्रीडा संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणेच ही निवडणूक व्हावी, अशीच इच्छा सर्व कबड्डीप्रेमींची आहे. पुढील निवडणूक सोपी जावी म्हणून खासदार लंके यांचे नाव आधीच अवैध ठरविले का? अशीही खेळाडूमध्ये चर्चा रंगली आहे.
राज्य कबड्डी संघटनेची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा संघटनेने मतदार म्हणून पाठवलेली खासदार नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले या दोघांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीत अवैध ठरवली होती.
त्यांना यावर म्हणणे मांडण्यासाठी 3 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु संघटनेने दिलेल्या मुदतीत सर्व अटींची पूर्तता केली होती. त्यानंतर ही अंतिम यादीत खासदार नीलेश लंके यांच्यासह काही जिल्ह्यांची नावे अवैध ठरविण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्य संघटनेवर वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार नीलेश लंके अजित पवार गटाकडे होते. त्यातूनच त्यांना कबड्डी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदावर संधी मिळाली होती; नंतर नीलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांकडे जाऊन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, आता त्यांचे नाव निवडणूक अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवले गेले.
राज्य संघटनेशी संलग्न २५ जिल्हा संघटनेकडून प्रत्येकी 4 नावे पाठवायची होती. या प्रमाणे 100 मतदार होतात. आता 7 नावे अवैध ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे 93 मतदार अंतिम यादीत राहिले आहेत.
रत्नागिरीचे अरविंद सावंत, साताऱ्याचे समीर थोरात, पालघर येथील तीन नावे अवैध ठरवली आहेत. त्यामध्ये मनोज ठाकूर, वल्केश राऊत व माणिक वोतोंडे यांची नावे आहेत. लंके जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर सच्चिदानंद भोसले, सुधाकर सुंबे व भारती पवार अशी चार नावे जिल्हा संघटनेने पाठवली होती. या चौघांची नावे मतदार यादीत आहेत. जिल्हा संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये वर्षापूर्वी बदल करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.