Pune News. : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाने अंतर्गत सर्वे करून कोणत्या जागा या भाजप उमेदवार सहजरीत्या जिंकू शकतात तर कोणत्या जागेवर भाजपला ताकद लावावी लागणारे यानुसार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता भाजपाचा गेम प्लॅन ठरला असून सर्व वरिष्ठ नेते मंडळींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व टिकवण्यासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुरलीधर अण्णा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत मतदारसंघ निहाय बैठका घेऊन, महाविकास अघाडीला चितपट करण्याच्या तयारीला लागले आहेत.
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांना विविध विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आली आहे. यात मुरलीधर मोहोळ यांच्यावर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली असून त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या पर्वती, कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
जबाबदारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी कंबर कसली असून ते कामाला लागले आहेत त्यांनी संघटनात्मक दौऱ्याची पहिली बैठक कसबा विधानसभेत घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी विधानसभा निवडणुका, पार्टीचे धोरण, पदाधिकाऱ्यांची भूमिका, विरोधकांकडून पसरवले जाणारे खोटे नॅरेटिव्ह, केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी, कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाय पदाधिकाऱ्यांची भूमिकाही यावेळी जाणून घेतली.
कसबा विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माझ्या अर्थात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला. भारतीय जनता पार्टीच्या पार्टीच्या विचारधारेला मानणारा आणि विकासाला साथ देणारा वर्ग कसबा विधानसभेत असून आगामी विधानसभा निवडणुकीतही हीच परंपरा कायम असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
कसबा विधानसभा मतदारसंघाची बैठक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मोहोळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाची देखील बैठक घेतली या बैठकीला आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या बैठकांच्या माध्यमातून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करत असतानाच एक प्रकारे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहील याबाबत इच्छुकांना आणि पदाधिकार्यांना अस्वस्थ करत आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गड राहिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे प्राबल्य पाहायला मिळालं. तर दुसरीकडे पुणे शहरांमध्ये गेल्या दशकामध्ये भाजपने आपला चांगला जम बसवला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुणे शहर राखणं आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील महाविकस आघाडीचा दबदबा असलेल्या जागा आपल्याकडे खेचून आणण्याचा मोठे दिव्य मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात भाजपला करावा लागणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.