Murlidhar Mohol : संपर्क असेल तर देव पण दिसेल; अण्णांनी दाखवून दिले...

Pune BJP : भाजपचा कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून लोकांच्या समस्या सोडवल्या. त्यातूनच त्यांना पक्षाने महापौरपदाची संधी दिली. त्यांनी या संधीचे सोने करताना पुणेकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : मुळशीतील मुठा गावापासून सुरू झालेला मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास आज थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत कायम लोकांमध्ये राहुनच काम केल्यानेच कमी कालावधीत मोहोळांनी मोठी झेप घेतल्याचे बोलले जात आहे. लोकांच्या पाठिंब्यानेच आता नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पेलणार असल्याचा विश्वासही मोहोळांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातून पहिल्यांदा खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यातूनच त्यांना पक्षाने महापौरपदाची संधी दिली. त्यांनी या संधीचे सोने करताना पुणेकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. कोरोना काळातील त्यांचे कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहणारे ठरले. याची पक्षाने दखल घेत त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवले. त्यांनीही लोकांच्या जिवावरच पक्षाचा विश्‍वास सार्थ करत सव्वा लाखांनी निवडून आले. आता मुरलीधर मोहोळ ऊर्फ अण्णा यांनी केंद्रीय राज्यमंत्री झाले आहेत.

कोथरूडमधील नागरिकांशी, मतदारांशी थेट संपर्क आणि लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची ओळख आहे. नगरसेवक म्हणून उत्कृष्ट सेवा केल्यानंतर मोहोळ यांच्यावर भाजपने विश्वास दाखविला. त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली. मोहोळ यांनीही पक्षाच्या नेत्यांचा विश्वास सार्थ करत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. त्यानंतर पक्षाकडून लोकसभेची तयारी करण्याचे आदेश मिळताच, मोहोळ यांनी शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मॅरेथॉन यांसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे लोकांचे व पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले.

लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहोळ यांना पुणे लोकसभा उमेदवारी दिली. त्यांनी निवडणुकीत आपल्या दांडगा जनसंपर्काचा उपयोग करून घेतला. यासाठी त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केला. याचे रुपांतर त्यांनी आपल्या घवघवीत यशात केले. त्यांनी विरोधक रवींद्र धंगेकरांचा १ लाख 23 हजार 38 मतांनी पराभव केला. तर दुसरीकडे भाजप व महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीचे हे दुःख मोहोळांच्या विजयाने कमी झाले आहे. यातूनच पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोचलेल्या मोहोळांची पक्षाने थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदावरच वर्णी लावली.

Murlidhar Mohol
PM Narendra Modi oath ceremony LIVE : मुरलीधर मोहोळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चे लागले नारे

पहिलवान 'अण्णा' झाला मंत्री !

कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसन मोहोळ हे मुठ्यावरून नोकरीनिमित्त पुण्यात आले. काही काळ मंडईत हमाली केल्यानंतर ते बँकेत सेवक म्हणून रुजू झाले. त्याचवेळी मोहोळ यांनी मुठा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीपर्यंतचे शिक्षण भावे स्कूलमध्ये घेतले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यावेळी वडिलांना रसवंतीगृहातही काही काळ मदत केली.

मोहोळ यांनी पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण कोल्हापूर येथे घेतले. त्याचवेळी आवड असल्याने त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. राज्यापासून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या खेळाची चमक दाखविली. शिक्षणानंतर पुण्यात येऊन कोथरूडमधील भवानीनगर, केळेवाडी येथेश्री साई मित्र मंडळाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. येथूनच मोहोळ हे कार्यकर्त्यांचे, जनतेचे 'अण्णा' झाले. आता हाच पहिलवान 'अण्णा' केंद्रीय मंत्री झाल्याचा कुटुंबीयांसह पुणेकरांना आनंद आहे.

Murlidhar Mohol
Ramdas Athawale : लोकसभेची एकही जागा लढवली नाही; रामदास आठवले तिसऱ्यांदा 'Modi 3.0' मंत्रिमंडळात

मोहोळांची कारकीर्दी

- 2002 - महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी निवड

- 2006 - महापालिकेच्या पोटनिवडणुकीत नगरसेवकपदी संधी

- 2007 ते 2012, 2017 ते 2022 - तीनदा नगरसेवक

- 2009 - खडकवासला विधानसभा निवडणूक लढविली

- 2017 - स्थायी समिती अध्यक्ष, दोन अर्थसंकल्प मांडले

- अडीच वर्षे पुण्याचे महापौरपद भूषविले

- भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

- 4 जून 2024 - खासदारपदी निवड

- 9 जून 2024 - केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com