Baramati Lok Sabha Constituency : दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. राष्ट्रवादीमधून महत्वाच्या नेत्यांना बरोबर घेऊन बाहेर पडलेल्या अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री पद घेत अजित पवार सत्तेत सहभागी देखील झाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा ध्यास केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.
यासाठी विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची खेळी महायुतीने केली आहे. लोकसभा निवडणुकीत एकाच घरातील हे दोन्ही उमेदवार समोरासमोर येणार असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नणंद-भावजय समोरासमोर येणार असल्याने राज्यासह संपूर्ण देशाचे बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती (Baramati) जिंकण्याचा संकल्प सोडला होता. त्या निवडणुकीत अमेठी जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. मात्र बी फॉर बारामतीचे स्वप्न भाजपचे पूर्ण झाले नाही. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा खासदार सुळे यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत कांचन कुल यांना दौंड, खडकवासला विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते उल्लेखनीय होती. या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड जिंकण्यांची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी धरत सुनेत्रा पवार यांना महायुतीच्या माध्यमातूम उमेदवारी देण्यात आली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) याचा बालेकिल्ला अशी ओळख बारामतीची आहे. आतापर्यंत या मतदारसंघावर पवार कुटूंबियांचे वर्चस्व राहिलेले आहे. यंदाच्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकाविण्याची तयारी गेल्या काही महिन्यांपासूनच भाजपने सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर काही नेत्यांनी देखील बारामतीचे दौरे केले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरविण्याची खेळी भाजपने केली असली तरी बारामतीमध्ये शरद पवार यांचे पारडे जड होऊ शकते. याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणून त्यांची सभा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची होणारी सभा ही केवळ बारामतीच्या उमेदवारासाठी नव्हे तर पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या शिरूर,मावळ, पुणे शहर या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी एकत्रित असणार आहे, असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातच पंतप्रधान मोदी यांची सभा व्हावी, यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेष आग्रही आहे. दहा वर्षापूर्वी २०१४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली होती. जानकर यांनी सुळे यांना कडवी लढत दिली होती. त्यावेळी देखील बारामती लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू ही सभा झालीच नाही. २०१९ मध्ये पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.