Pune News, 26 Sep : पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून तो नागरिकांसाठी खुला करण्यासाठी तयार आहे. या मेट्रो मार्गाचे उद्घाटन गुरुवारी (ता. 26 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.
मात्र, मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोकडून या मार्गाचे उद्घाटनही पुढे ढकलण्यात आले आहे.
आता नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो प्रवासासाठी वाट पाहावी लागणार आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत उद्या मेट्रोचे उद्घाटन करायचं असा चंग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून चाललेल्या पावसामुळे सभा स्थळी चिखल झाला आहे. तसेच हवामान खात्याने देखील रेड अलर्ट दिल्याने ही सभा होऊ शकणार नाही याचा अंदाज आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, ज्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं ती मेट्रोमार्गीका गेल्या कित्येक दिवसांपासून तयार असून ती फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
पंतप्रधानांनी पुण्याची मेट्रो ही फुलराणी करून टाकली आहे. त्याप्रमाणे उद्यानातील फुलराणीचे उद्घाटन होतं. त्याप्रमाणे मोदी मेट्रोच्या उद्घाटनाला पाच वेळा आले आहेत. एका छोट्याशा मेट्रोमार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान आणि यावे म्हणून नागरिकांचे हाल करणे योग्य नाही. जर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन महायुतीच्या सरकारने लांबणीवर टाकले तर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस मिळून या मेट्रो मार्गाचे उद्या सकाळी ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते उद्घाटन करेल इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.
तसेच उद्या महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी एकत्रित येऊन या मेट्रोमार्गीकेचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन पुढील 24 तासात ही मेट्रोमार्गीका सुरू करावी. अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे, असा इशारा जगताप यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.